Pune : कार्तिकी पौर्णिमेला विद्यापीठात नवरसांचा आविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PUNE

कार्तिकी पौर्णिमेला विद्यापीठात नवरसांचा आविष्कार

पुणे : रोहिणी नक्षत्र आणि चंद्राच्या मिलनाचे हृदयस्पर्शी कथानक सादर करणारा चंद्र-रोहिणी नृत्याविष्कार, मानवी जीवनातील नियम आणि अपवादांचा पोकळपणा विशद करणारे नाटक, दुर्गा-मालकंस सारख्या रागांची उधळण करणारे शास्रीय गायन, बंगाली नाट्यविश्व साकारणारे अलोरगान नाटक, पहाटगितांच्या मंगलमय स्वरांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंगणमंच नवरसांच्या कलाविष्कारांनी न्हाऊन निघाला होता.

कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.१९) रात्रीपासून शनिवारी (ता.२०) पहाटेपर्यंत विविध कलाविष्कारांचे आयोजन विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या (गुरुकुल) वतीने करण्यात आले होते. भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र, भिमसेनजोशी अध्यासनांतर्गत ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रमाद्वारे माजी विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केले.

यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, डॉ. विभाकर निरस्कर, नृत्य गुरू अस्मिता ठाकूर आदी उपस्थित होते. अपवाद आणि नियम या नाट्यप्रयोगाने सुरवातीपासूनच प्रेक्षकांना रंगमंचाच अविभाज्य भाग बनविले, माधवी केळकर यांच्या शास्रीय गायनाने वातावरणाची पवित्रता अधिकच वाढविली. चंद्र-रोहिणी नृत्याविष्काराने तर ललित पौर्णिमेला प्रकाशमान केले. वाघाची गोष्ट हा नाट्यप्रयोग, बंधमुक्त हे तीन एकपात्री, केळुरीचं नाटक व सोंगाड्या कॉकटेल या एकपात्री सादरीकरणाने प्रेक्षकांना खेळवून ठेवले. मराठी लोकपरंपरेतील पहाट गीतांनी या ललित मैफलीला अत्यानंदाच्या परम शिखरावर नेऊन ठेवले होते.

कोरोनाकाळात सर्वात प्रथम बंद झाले ते शाळा आणि महाविद्यालये, तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही याकाळात बंद होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मानसिक आणि आर्थिक आव्हानांवर लढणाऱ्या कलाकारांना खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज खऱ्या अर्थाने आमचा अंगणमंच श्वास घेऊ लागला आहे.

- प्रवीण भोळे, विभागप्रमुख, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

loading image
go to top