खेड्यांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम महत्त्वाचे; IOCचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य याचं मत

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 December 2020

"पुणे इंटरनॅशनल सेंटर' (पीआयसी)च्या वतीने आयोजित आठव्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन (एनसीएसआय)च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

पुणे- उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्‍यक वित्तपुरवठा आणि तंत्रज्ञान यांची उपलब्धता देशात आहे. अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच ग्रामीण भागाला सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी केले. "पुणे इंटरनॅशनल सेंटर' (पीआयसी)च्या वतीने आयोजित आठव्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन (एनसीएसआय)च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने, सहयोगी संचालक अभय वैद्य, अर्बन डेव्हलपमेंटचे संचालक किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते. दोन दिवसीय ऑनलाईन परिषदेचे आयोजन पीआयसीच्या वतीने करण्यात आले असून नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन (एनआयएफ) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यांचे सहकार्य परिषदेला लाभले आहे. वैद्य म्हणाले,""आपल्या देशात नाविन्यपूर्ण स्टार्टअप येत आहेत, मात्र परदेशाच्या तुलनेत त्यांची संख्या कमी आहे. आपल्या देशात स्टार्टअपला मेंटरिंग, क्रेडिट सपोर्ट, ट्रेंनिग, मार्केटिंग यांसारखे उत्तम सहकार्य मिळाल्यास त्यांचा जलद विकास होऊ शकतो. याबरोबरच शहरी आणि ग्रामीण भागात असलेल्या सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या संधीचा लाभ युवकांनी घेण्याची आवश्‍यकता आहे.''शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील नावीन्यपूर्ण संशोधनांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा एनसीएसआयच्या आयोजनामागील उद्देश आहे. 

महाविकास आघाडीचा विजय म्हणजे आमच्या कामाची पोचपावती- विश्वजीत कदम

देशभरातील 100 हून अधिक संशोधकांनी यावर्षी परिषदेसाठी नोंदणी केली होती. ज्यामधून तज्ज्ञ समितीकडून आठ राज्यातील 18 सामाजिक संशोधकांची (सोशल इनोव्हेटर्सची) निवड करण्यात आली आहे. यामध्ये 11 संशोधक हे महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. आदिवासी, ग्रामीण व शहरी अशा तीन प्रकारात हे संशोधक आपल्या नवसंकल्पांचे सादरीकरण परिषदे दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करतील. यामधून शेवटच्या सत्रात प्रत्येक विभागातील एका संशोधकाची निवड करीत त्याला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. तीन विभागातील तीन संशोधकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व नागरिकांना सहानुभूतीची गरज आहे आणि म्हणूनच सामाजिक संशोधनाचे (सोशल इनोव्हेशन) महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र हे करीत असताना ग्रामीण भारताला महत्त्व द्यायला हवे. कारण अशा उपक्रमांच्या विकेंद्रीकरणाचा फायदा हा तळागाळातील नागरिकांना व्हावा, हाच अशा संशोधनामागील मुख्य हेतू असतो, असं पीआयसीचे प्रमुख  डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणालेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IOC President Shrikant Vaidya said Innovative initiatives important for village empowerment