
राज्यभरात सहापैकी पाच जागांवर बहुमताने महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले
पुणे-"राज्यभरात सहापैकी पाच जागांवर बहुमताने महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. हा ऐतिहासीक विजय म्हणजे सुज्ञ सुशिक्षीत मतदारांनी गेल्या वर्षाभरात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाला दिलेली पोचपावती आहे,' अशा शब्दात राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी शुक्रवारी भाजपला प्रतिउत्तर दिले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. त्यानिमित्त कॉंग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शिक्षक मतदार संघातून विजयी झालेले प्रा जयंत आसगावकर, माजी आमदार उल्हास पवार, शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब बोडके यांच्यासह अन्य नेते मंडळी उपस्थित होती. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात रोष आहे. तो या निवडणूकीच्या माध्यमातून दिसून येईल, असे वक्तव्य केले होते. त्यावर कदम यांनी हे प्रतिउत्तर दिले.
गावांच्या समृद्धीसाठी चतुःसूत्रीचा अवलंब हवा - नितीन गडकरी
कदम म्हणाले, " महाविकास आघाडीच्या सरकारला वर्षपुर्ती झाली. आज राज्यातील सहा विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचा ऐतिहासीक विजय झाला. शिवसैनिकांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तन-मन-धनाने अहोरात्र काम केले. त्यामुळे भाजपाचा पराभव करू शकलो. गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपाने पदवीधर-शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जी कामे केली. त्यावर सुज्ञ, सुशिक्षीत मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करून त्यांच्या कामावर विश्वास दाखविला आहे.''
या निकालवर प्रतिक्रिया देताना चंद्रकात पाटील यांनी " हे हिंमत असेल तर एकएकेट्याने लढा' असे आव्हान महाविकास आघाडीला दिले. त्या प्रश्नावर कदम म्हणाले," महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हेच यावरचे उत्तर आहे. वर्षभरात हे सरकार पडेल अशी अफवा परसरवली जात होती. पण हे सरकार टिकले. विजयाकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर देणं गरजेचं वाटत नाही.''