Pune : इंग्रजी,फ्रेंच,संस्कृत भाषेवर प्रभुत्व गाजवणारी इरा रोहन भिलारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

इंग्रजी,फ्रेंच,संस्कृत भाषेवर प्रभुत्व गाजवणारी इरा रोहन भिलारे

पुणे : ज्या वयात मुलांना मातृभाषा देखील व्यवस्थित बोलता येत नाही, त्याच वयात इंग्रजी व फ्रेंच भाषेत अंक, आठवड्यातील दिवस, स्वतःबद्दल प्रश्न -उत्तरं, कविता, विविध संस्कृत मंत्र, राष्ट्रगीत, खंडांची नावे सांगत अवघ्या तीन वर्षांच्या इरा रोहन भिलारे हीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या या हुशारीमुळे तिच्या नावाची अल्पावधीतच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ‘कलाम वर्ल्ड रेकॉर्ड’२०२१ मध्ये नोंद करण्यात आली आहे.

इरा ही मुळची पुण्याची असून सध्या तिचे कुटुंब हे दुबईमध्ये राहत आहे. इराचे वडील रोहन भिलारे हे प्रकल्प व्यवस्थापक आहेत. तर आई आरती भिलारे या फ्रेंच भाषेच्या शिक्षिका आहेत. याबाबत आरती यांनी सांगितले, ‘‘लहानपणापासूनच इरा विविध गोष्टींमध्ये सक्रिय आहे. ती तल्लख बुद्धीची कोणतीही गोष्ट पटकन लक्षात ठेवते. आम्हाला या गोष्टीची हुरूप वाटली आणि इरा अधिकाधिक प्रमाणात कशी पारंगत होऊ शकते यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. पालक हे मुलांचे प्रथम गुरू म्हणून आम्हीच तिचा सराव करून घेत होतो. तिला संस्कृत, इंग्रजी आणि फ्रेंच या तिन्ही भाषांमध्ये अंक, कविता अशा विविध गोष्टी शिकवल्या. या सर्व गोष्टी ती तोंडपाठ सांगते. त्याचबरोबर १३ योगासनं करून दाखवते. तिचे हे कौशल्य सर्वांपर्यंत पोचावे म्हणून जागतिक स्तरावरील नोंदवलेले विविध विक्रमांची माहिती घेत त्यामध्ये अर्ज भरला. तर ७ ऑक्टोबरला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि २७ ऑक्टोबरला ‘कलाम वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये इराची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. तसेच प्रमाणपत्रासाठी नामांकन मिळाले.

‘‘इरा २ वर्षाची असल्यापासून तिला प्रत्येक गोष्ट शिकवायला सुरवात केली. तिचा उत्साह पाहून या सर्व गोष्टी आम्ही सहजपणे करू शकलो. कोरोनामुळे ऑनलाइन स्पर्धेसाठी नोंदणी केली व सर्व माहिती ऑनलाइन पाठवली. तिने अवघ्या २ वर्ष ९ महिन्यात ‘दोन’ रेकॉर्ड करून आम्हाला व आमच्या कुटुंबाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.’’

- रोहन भिलारे, इराचे वडील.

loading image
go to top