
पिंपरी : लॉकडाउनच्या कालावधीत सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासह लाठीचा प्रसाद, परेडची, व्यायामाची तसेच कोंबडा होण्याची देखील शिक्षा केली.
गुन्हा दाखल झाल्यास कायदेशीर कारवाई होण्यासह महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते, याचेही अनेकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा बेजबाबदार, निष्काळजी नागरिकांना आणखी कोणत्या कायद्याची भाषा शिकवावी, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. गर्दी टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास पूर्णपणे मनाई आहे. तरीही अनेकजण विनाकारण बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना आढळून येतात. अशा बेफिकिरीमुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू शकतो, याची कल्पना असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालत अनेकांचा शहरात फेरफटका सुरूच आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पोलिसांकडून केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 15 पोलिस ठाण्यांतर्गत अद्यापपर्यंत तब्बल तीन हजार 252 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यासह लाठीचा प्रसादही दिला जात आहे. दोन दिवसांपुर्वी निगडी व मोशी प्राधिकरण येथे 'मॉर्निंग वॉक'साठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना परेड, व्यायाम करण्यासह कोंबडा होण्याची शिक्षा केली. विशेष म्हणजे यामध्ये एका माजी महापौरांचादेखील समावेश होता. प्रशासनाकडून वारंवार कारवाईचा बडगा उगारला जात असतानाही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडतच असल्याचे दिसून येत आहे.
मुलाला घरी कमरत नाही
रविवारी (ता.19) दुपारी बाराच्या सुमारास पिंपरीतील काळेवाडी पुलाजवळून दुचाकीवरून छोट्या मुलासह जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी थांबविले. कुठे चाललात? याबाबत विचारणा केली असता घरात मुलाला करमत नाही म्हणून बाहेर आल्याचे उत्तर त्याने दिले.
भविष्यात निर्माण होऊ शकते अडचण
सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास दंड व कैद अशी शिक्षेची तरतूद आहे. यासह नोकरीसह अनेक कामांसाठी चारित्र्य पडताळणीचा दाखला आवश्यक असतो. मात्र, गुन्हा दाखल असल्यास चारित्र्याचा दाखला मिळत नाही. यामुळे नोकरी मिळू शकत नाही. तसेच परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट मिळविण्यातही अडचण निर्माण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.