पुणे : पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पहा कसे फसवले...

भरत पचंगे
Saturday, 9 May 2020

शेतकरी झाले संतप्त

शिक्रापूर (पुणे) : शिक्रापूर परिसरातील शेतकऱ्यांना उद्या रविवारी (ता. 10) रात्री दहा वाजता चासकमानच्या धानोरे-कोरेगाव पाटाला पाणी सोडण्याची लेखी ग्वाही देणाऱ्या पाटबंधारे खात्याने आज त्याच आंदोलक शेतक-यांना पाणी सोडता येणार नाही असे लेखी पत्र पाठवून घूमजाव केले. अर्थात दोनच दिवसात पाटबंधारे खात्याने फिरवलेल्या शब्दाने शिक्रापूर परिसरातील दहा गावांतील शेतकरी संतप्त झाले असून पाणी मिळेपर्यंत आंदोलक शेतक-यांनी आंदोलन पुन्हा उभारण्याचा निर्धार केला आहे. 

पुणे : मजूर चालले होते पाय तुडवत अन् पोलिसांनी पहा काय केले

शिक्रापूर परिसरातील दहा गावांच्या वतीने जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील धानोरे-कोरेगाव चासकमान वितरण शाखेवर मंगळवारी (ता. 5) समाधान डोके, बाळासाहेब चव्हाण, बापूसाहेब मासळकर, राजाराम केवटे, जितेंद्र खंडाळे आदींनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. 

पुणे : बस चालकाचे नियंत्रण सुटले अन्‌ पहा काय घडले... 

विद्यमान खासदार-आमदार यांच्या निष्क्रीयतेमुळे पाणी वितरणाची समस्या निर्माण झाल्याचा फलक लावून शेतक-यांनी आंदोलनाला सुरूवात करताच दूस-या दिवशी चासकमान धरण विभागाचे सहायक अभियंता प्रेमनाथ शिंदे, शाखा अभियंता महेंद्र गायकवाड व धरण शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी चर्चा करून शेतक-यांचे वतीने उपस्थित ऍड. अशोक पलांडे व जवळपास दोनशे शेतक-यांना रविवारी (ता. 10) रात्री दहा वाजता पाणी सोडत असल्याचे लेखी दिले. शेतक-यांनी आनंदोत्सव सुरू केला पण हा आनंद आज पूर्ण संतापात परिवर्तित झाला. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कारण आज चासकमान खेड विभागाचे सहायक अभियंता महेंद्र गायकवाड यांनी अचानक एक पत्र देत शेतकरी आंदोलकांना तसेच जातेगाव खुर्द येथील हनुमान पाणी वाटप संस्थेला कळवून रविवारी (ता. 10) पाणी देण्यात येणार नाही व या चालू आवर्तनात पाणी सोडले जाणार नसल्याचे कळविले आहे. 

या शिवाय पुढील आवर्तनातच पाणी दिले जाईल असेही कळविल्याची माहिती शेतक-यांनी दिली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी शिक्रापूर पोलिसांना आंदोलन तीव्र करण्याचे पत्र नुकतेच दिले आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणात पाटबंधारे खात्याने दहा गावांतील शेतकऱ्यांची जाहीर लेखी फसवणूक केली असून याबाबत पुढील काळात काही शेतक-यांकडून अनुचित प्रकार घडल्यास त्या संपूर्ण प्रकाराला पाटबंधारे खाते जबाबदार असणार आहे. 

आंदोलन आम्ही आणखी तीव्र करीत असून पाणी मिळाल्याशिवाय आता आम्ही आणि आमचे संपूर्ण कुटुंबीय थांबणार नसल्याचा इशाराही शेतक-यांचे वतीने समाधान डोके, बाळासाहेब चव्हाण, बापू मासळकर, जितेंद्र खंडाळे, राजाराम केवटे व शेतक-यांनी दिला. 

पाटबंधारे खात्याने फसविल्याचे पुरावे पाठविले मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे...! 

दोनच दिवसात पाटबंधारे खात्याने लेखी फसवणूक केल्याचे सर्व पुरावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, शिरूर तहसीलदार व शिक्रापूर पोलिस निरीक्षक यांना तातडीने मेल तसेच ट्‌विट करून पाठविल्याची माहिती समाधान डोके यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrigation Department was cheated with farmers