खानदेशात पावसाअभावी सिंचन प्रकल्पांतील आवक अल्प

खानदेशात पावसाअभावी सिंचन प्रकल्पांतील आवक अल्प
Published on

पावसाअभावी सिंचन प्रकल्पांतील आवक अल्प

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात यंदा पावसाचा जोर सध्या नाही. काही भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. पाऊस नसल्याने विविध सिंचन प्रकल्पांतील आवकही अल्प किंवा शून्यावर आहे.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होता. विविध सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळी वाढली होती. तर काही सिंचन प्रकल्प या पावसात पूर्ण भरले. पण यंदा अजून अनेक प्रकल्प भरलेले नाहीत. चाळीसगावनजीकच्या गिरणा धरण लाभक्षेत्रातील पावसाने भरले आहे. आता अल्प आवक या धरणात सुरू आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. परंतु नांदगाव व जळगावातील चाळीसगाव तालुक्याच्या सीमेवर हे धरण आहे. त्याचा लाभ जळगावला अधिक असून, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगावातील २१ हजार हेक्टरला लाभ होते. रब्बी हंगामास पाणी मिळते. तसेच नाशिकमधील मालेगाव औद्योगिक वसाहतीसह चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहर व अन्य १०० गावांच्या पाणी योजनांनाही गिरणा धरणातून पाणी दिले जाते. नाशिकमधील पावसाने धरणात जलसाठा सतत वाढला. परंतु त्यातील आवक आता कमी होत आहे. या धरणात नाशिकमधील ठेंगोडा बंधारा व हरणबारी, चणकापूर, केळझर, पुनद या प्रकल्पांतून पाण्याची आवक सुरू होती. आता फक्त अल्प आवक सुरू आहे.

नाशिकमधील चांदवड, सटाणा, मालेगाव व नांदगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यास गिरणा धरणातील आवकेत वाढ होईल, अशी माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात एरंडोलातील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती या प्रकल्पांतील जलसाठा अल्प आहे. जामनेरातील तोंडापूर, वाघूर धरणातही आवक नाही. धुळ्यातील अनेर, अमरावती, बुराई, सोनवद या प्रकल्पांत पाण्याची अत्यल्प आवक सुरू आहे. पावसाळ्याचे ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. पुढील काळात पाऊस झाल्यास प्रकल्प भरतील.

--- चौकट ----
हतनूरमधून विसर्ग सुरूच
तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. परंतु त्यातून विसर्ग सुरूच आहे. जलसाठा नियंत्रणासाठी त्यातून विसर्ग केला जात आहे. नंदुरबारात गोमाई, सुसरी, रंगावली नदीतही प्रवाही पाणी कमी झाले आहे. जळगाव जिल्ह्यात अनेर, पांझरा नदीतही पाणी प्रवाह कमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com