Isis : ‘इसिस’कडून पुणे शहर लक्ष्य! दहशतवादी कारवाया वाढल्या

‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांकडून पुणे शहरात मोठा घातपात घडवून आणण्याचा कट होता, ही बाब तपास यंत्रणांच्या चौकशीत स्पष्ट झाली आहे.
ISIS
ISISsakal

पुणे - ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांकडून पुणे शहरात मोठा घातपात घडवून आणण्याचा कट होता, ही बाब तपास यंत्रणांच्या चौकशीत स्पष्ट झाली आहे. मुंबई, ठाण्यासह पुणे शहरालाही आता ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने लक्ष्य केल्याचे दिसून आल्याने तपास यंत्रणांसमोर हे मोठे आव्हान आहे.

पोलिसांनी कोथरूड परिसरात नाकाबंदीदरम्यान १८ जुलैला पहाटे दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद याकूब साकी (रा. रतलाम, मध्य प्रदेश) या दोघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार शहानवाज आलम तेथून फरार झाला.‌ पोलिसांनी कोंढव्यातील दोघांच्या घराची झडती घेतली. तेथून ड्रोन, बॉम्बचे साहित्य जप्त करण्यात आले.

त्यांच्याकडील संगणकातील माहितीवरून हे दोघे ‘एनआयए’ने फरार जाहीर केलेले आणि त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस असून ‘सुफा’ संघटनेचे दहशतवादी असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’कडे सोपविण्यात आला.

‘एटीएस’च्या तपासात या दहशतवाद्यांनी सासवड, सातारा परिसरातील जंगलात बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण घेतल्यासह काही धक्कादायक बाबी समोर आल्या. हा तपास सुरू असतानाच ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र इसिस मॉड्यूलप्रकरणी कोंढव्यातून भूलतज्ज्ञ डॉ. अदनानअली सरकार याला अटक केली. अदनानअली हा इसिसमध्ये तरुणांची रिक्रुटमेंट करीत होता.‌

अदनान अलीचा निकटवर्तीय झुल्फिकार बडोदावाला याला ‘एनआयए’ने यापूर्वी ठाण्यातील नागपाडा येथून अटक केली होती. ‘एटीएस’ने त्याला मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने या दोन दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून जमिनीत पुरून ठेवलेले बॉम्बचे साहित्यही जप्त करण्यात आले. संगणकीय डेटा आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस यावरून एकूणच इसिस आणि या दोन दहशतवाद्यांचे कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले.

दहशतवादी दीड वर्षांपासून कोंढव्यात वास्तव्यास होते. त्यांनी दुचाकीवर आणि ड्रोनद्वारे पुणे शहरातील काही संवेदनशील ठिकाणी रेकी केली.

राजस्थान येथे एप्रिल २०२२ मध्ये ‘एनआयए’ने कारमधून स्फोटके जप्त केली होती. या प्रकरणात ‘एनआयए’ने मागील महिन्यात मुंबईतून ताबिश नासिर सिद्दिकी, पुण्यातील कोंढवा येथून झुबेर नूर मोहम्मद ऊर्फ अबू नुसैबा, ठाण्यातील शरजील शेख, झुल्फीकार अली बडोदावाला आणि कोंढव्यातून डॉ. अदनान अली सरकार यांना अटक केली होती. त्यानंतर शनिवारी भिवंडी येथून इसिसशी संबंधित आकिफ अतीक नाचन या सहाव्या आरोपीला अटक केली. आकिफने दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

जर्मन बेकरी ते कुरुलकर

पुणे शहरात यापूर्वी कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात दुचाकीच्या डिक्कीत झालेला स्फोट आणि जंगली महाराज रस्त्यावर सायकलींचा वापर करून साखळी स्फोटाच्या घटना घडल्या आहेत.

मागील काही दिवसांत पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून गोपनीय माहिती घेतली आहे. ‘एटीएस’च्या तपासात कुरुलकरबाबत नवीन माहिती समोर येत आहे. या घटनांवरून पुणे शहर पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. त्यादृष्टीने तपास यंत्रणाही अधिक सतर्क झाल्या आहेत.

तपास यंत्रणांमध्ये समन्वय

पुणे पोलिस, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) पुणे शहरातील घातपाताचा कट उधळून लावण्यात मोठे यश मिळाले आहे. अदनान अली याच्यावर पुणे एटीएसचाही ‘वॉच’ होता. काही महिन्यांपूर्वी त्याबाबतचा अहवाल राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे पाठवण्यात आला होता.

दहशतवाद्यांना आश्रय देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण, आर्थिक रसद पुरविणाऱ्या सिमाब नसरुद्दीन काझी आणि इतर साथीदारांना एटीएसकडून झालेली अटक यावरून तिन्ही तपास यंत्रणांमध्ये योग्य समन्वय असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com