पूरग्रस्तांना आठ दिवसांत उर्वरित दहा हजार देणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पुरात बेघर झालेल्या कुटुंबांना १५ पैकी उर्वरित दहा हजार रुपये कधी मिळणार, अशी विचारणा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा, येत्या आठ दिवसांत ही मदत देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकऱ्यांनी दिले.

पुणे - पुरात बेघर झालेल्या कुटुंबांना १५ पैकी उर्वरित दहा हजार रुपये कधी मिळणार, अशी विचारणा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा, येत्या आठ दिवसांत ही मदत देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकऱ्यांनी दिले.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूरग्रस्तांच्या मागण्यांसह विविध प्रकल्पांतील अडथळ्यांच्या पार्श्‍वभूमीवर महापौर मोहोळ यांच्यासह उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची शुक्रवारी भेट घेतली.  पूरग्रस्तांना १५ हजारांची मदत जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र पाचच हजार मिळाले. साडेतीन महिने झाले तरी मदत मिळत नाही. त्याशिवाय पूर्णपणे नुकसान झालेली घरे, दुकानमालकांना मदत व्हावी, यासाठी ६ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे; परंतु, त्यावरही कार्यवाही झाली नाही. चांदणी चौक उड्डाण पूल भूसंपादन, समान पाणीपुरवठा, पंतप्रधान आवास योजना, भिडेवाडा, पाषाण-कोथरूड बोगदा आदी प्रकल्पांतील अडचणी सोडविण्याबाबत मार्ग काढण्याचा निर्णय या वेळी झाला, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.
 
सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव 
महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येईल. त्यासाठी पदाधिकारी, आयुक्त, संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे घाटे आणि रासने यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It will provide the remaining ten thousand in eight days to the flood victims