#PmpIssue ‘आयटीएमएस’ यंत्रणा बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मिडी बसमधील ‘आयटीएमएस’मधील यंत्रणा बंद पडल्यामुळे प्रशासनाने सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा दंड टाटा मोटर्स या उत्पादक कंपनीला ठोठावला. मात्र, तो अद्याप वसूल झालेला नसून, या बसमधील ही यंत्रणा कधी सुरू झालीच नव्हती, अशीही धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.

पुणे - ‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मिडी बसमधील ‘आयटीएमएस’मधील यंत्रणा बंद पडल्यामुळे प्रशासनाने सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा दंड टाटा मोटर्स या उत्पादक कंपनीला ठोठावला. मात्र, तो अद्याप वसूल झालेला नसून, या बसमधील ही यंत्रणा कधी सुरू झालीच नव्हती, अशीही धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘पीएमपी’च्या ताफ्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये डिझेलवर धावणाऱ्या सुमारे २०० मिडी बस टप्प्याटप्प्याने आल्या. बसमध्ये पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, सीसीटीव्ही सिस्टीम, स्पीकर, ॲम्प्लिफायर, सिस्टीम कंट्रोल युनिट, ड्रायव्हर डिस्प्ले युनिट आदी ‘आयटीएमएस’ची यंत्रणा असेल, असे टाटा मोटर्स आणि ‘पीएमपी’मध्ये २२ मार्च २०१७ मध्ये झालेल्या करारात म्हटले आहे. या बस दाखल झाल्यावर त्यात ‘आयटीएमएस’ची यंत्रणा कार्यान्वित असणे अपेक्षित होते. तसेच, त्यातील यंत्रणा पीएमपीच्या नियंत्रण कक्षाशी जोडली जाईल, असेही अपेक्षित होते; परंतु बसमधील ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नव्हती. यामुळे अखेर ‘पीएमपी’ने टाटा मोटर्स कंपनीला नोटीस दिली. 

टाटा मोटर्सला ‘आयटीएमएस’यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगण्यात आले; परंतु त्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे करारातील तरतुदीनुसार ‘पीएमपीने’ प्रतिबस प्रतिदिन ५०० रुपये दंड आकारणीचा प्रस्ताव तयार केला. ‘पीएमपी’च्या अध्यक्षा आणि व्यवस्थाकीय संचालिका नयना गुंडे यांनी ६ जून २०१८ रोजी दंड आकारणीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तेव्हापासून ‘पीएमपी’कडून दररोज हा दंड आकारण्यात येत आहे; परंतु त्याची वसुली अद्याप झालेली नाही.

करारातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यामुळे ‘टाटा मोटर्स’ला दंड ठोठावला आहे. तो वसूल करण्यावर लक्ष दिले जाईल. तसेच, आत्तापर्यंत त्यांनी दंड का भरला नाही, याचीही चौकशी करू. संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला जाईल. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर

टाटा मोटर्सने ‘आयटीएमएस’चे काम ‘आउटसोर्स’ केले होते. तसेच त्यांना याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. ‘आयटीएमएस’ सुरू होत नाहीत तोपर्यंत हा दंड केला जाईल. दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांसाठी ‘आयटीएमएस’ आवश्‍यक असून, ती सुरू करण्याचा आग्रह असेल. 
- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITMS System Close