esakal | अजित पवारांशी संपर्क साधला अन् सूत्रे फिरली; बारामतीतील जनता कर्फ्यूबाबत महत्त्वाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar.jpg


पुढील सात दिवसांचा निर्णय येत्या रविवारी होणार

अजित पवारांशी संपर्क साधला अन् सूत्रे फिरली; बारामतीतील जनता कर्फ्यूबाबत महत्त्वाचा निर्णय

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शहरातील 14 दिवसांच्या जनता कर्फ्यूला बारामतीतील व्यापा-यांनी तीव्र विरोध केल्यानंतर आज पुन्हा सात दिवसानंतर बसून चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. परिस्थिती बघून पुढील सात दिवसांबाबतचा निर्णय रविवारच्या (ता. 13) बैठकीत घेतला जाणार आहे.  बारामतीच्या व्यापा-यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सूत्रे फिरली आणि आज उपविभागीय अधिका-यांनी व्यापा-यांना चर्चेला पाचारण करुन त्यांचे मत जाणून घेतले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल बारामतीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व सभापती नीता बारवकर यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. सोमवारपासून (ता. 7) पुढे 14 दिवस जनता कर्फ्यू पाळला जावा अशी अपेक्षा यात व्यक्त केली होती. मात्र एकाही व्यापा-याला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी होती. दरम्यान, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या दालनात आज व्यापारी, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांची बैठक झाली. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, मुख्याधिकारी किरणराज यादव, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील आदी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत 14 दिवस व्यापारपेठ बंद ठेवण्यास सर्वच व्यापा-यांनी एकमुखी विरोध केला. या अगोदर प्रत्येक वेळेस प्रशासनास व्यापा-यांनी संपूर्ण सहकार्य केले आहे, आता व्यापा-यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे ही भावना बोलून दाखवली गेली. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

त्यानंतर सर्वांच्या भावना लक्षात घेता सात दिवसानंतर पुन्हा एकदा एकत्र बसून या बाबत निर्णय घेऊ अशी ग्वाही दादासाहेब कांबळे यांनी दिली. एकीकडे बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन करा असा दबाव येत असताना व्यापा-यांनी आज तीव्र भावना व्यक्त केल्याने प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, नरेंद्र मोता, अमोल वाडीकर, सुशील सोमाणी, प्रवीण आहुजा, स्वप्नील मुथा, सुजय निंबळककर, शैलेश साळुंके, नीलेश कोठारी यांच्यासह नगरसेवक सुनील सस्ते व अनेक व्यापारी उपस्थित होते. 

व्यापा-यांना विश्वासात घ्यायला हवे होते....
बारामतीतील व्यापारपेठ तब्बल 14 दिवस बंद करण्याचा निर्णय चार लोकांनी बसून घेणे चुकीचेच होते, या बाबत सर्वच व्यापा-यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. निर्णय जाहिर करण्यापूर्वी व्यापा-यांशी चर्चा केली असती तर अधिक उचित झाले असते अशी भावना सर्वच व्यापा-यांनी बैठकीदरम्यान बोलून दाखवली. अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्याने किमान व्यापा-यांना विचारात घेतले गेले. 


सात दिवस व्यापा-यांनी या जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा, येत्या रविवारी पुन्हा एकदा बसून पुढील सात दिवसांबाबत धोरण ठरविले जाणार आहे. त्या मुळे बारामती शहर व कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापा-यांनी या बंदला सहकार्य करणे गरजेचे आहे.

– नरेंद्र गुजराथी व महावीर वडूजकर.