पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

Corona-Test
Corona-Test

पुणे - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अत्यवस्थ कोरोना रुग्णांना पुणे शहरातील रुग्णालयांमध्ये वेळेत ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटर मिळेनासे झाले आहेत. केवळ बेडअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने गेल्या आठवडाभरात आठ ते दहा रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या एका परिचराचाही समावेश आहे. या परिचराला अन्य कुठलाही आजार नव्हता. केवळ वेळेत ऑक्‍सिजन बेड न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत चौपट वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना पुणे शहरात ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणे, त्यांना वेळेत हवी ती रुग्णवाहिका (साधी, ऑक्‍सिजनसह किंवा कार्डियाक) उपलब्ध करून देणे आणि हवी असणारी औषधे वेळेत उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर ‘एक खिडकी’ पद्धत (सिंगल विंडो सिस्टिम) सुरू करण्याची 
गरज आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्णांना पुणे शहरात बेड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेला रुग्णालय व्यवस्था कक्षच हतबल झाला आहे. या कक्षाला शहरातील रुग्णालये दाद देत नाहीत. कोणत्या रुग्णालयात ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत, याची साधी माहितीही या कक्षाकडे नसते. त्यामुळे हा कक्ष काय कामाचा, असा सवाल भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केला आहे. पुणे जिल्हा परिषदेने नुकताच हा कक्ष स्थापन केला आहे. या कक्षासाठी रुग्णालयनिहाय उपलब्ध बेडची माहिती जमा करण्याकरता प्रत्येक रुग्णालयात दोन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना शहरातील रुग्णालये काहीच माहिती देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे जिल्ह्यात पूर्वी दिवसांत साधारण १५० नवे कोरोना रुग्ण आढळून येत होते. आता रोजचे हेच प्रमाण ९०० वर गेले आहे. याशिवाय पूर्वी एका दिवसात कमाल ६ रुग्णांचा मृत्यू होत होता. आता रोज किमान २४ रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे.

ऑक्‍सिजन बेड मिळालाच नाही...
जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागात कार्यरत असलेला कर्मचारी खेड शिवापूरला (ता. हवेली) राहत होता. सुरुवातीला नसरापूरला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर तेथील डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार त्याने कोरोना चाचणी केली. अहवाल येईपर्यंत श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. २१ ऑगस्टला कोरोनाचे निदान झाले. उपचारासाठी ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता होती. तेव्हापासून दोन दिवस प्रयत्न करूनही बेड मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने सुरू झालेल्या विप्रो रुग्णालयात दाखल केले. पण, तेथेही ऑक्‍सिजन बेड उपलब्ध नव्हता. तिसऱ्या दिवशी केवळ बेडअभावी मृत्यू झाल्याचे त्याच्या कार्यालयीन सहकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेने हे करण्याची गरज...

  • पुणे महापालिकेच्या धर्तीवर सिंगल विंडो सिस्टिम
  • उपलब्ध ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडची माहिती दर तासाला ऑनलाइन देण्याची सोय
  • जिल्हास्तरावर जबाबदार अधिकारी नियुक्त करावा 
  • समन्वयकांच्या मदतीने गरजू रुग्णाला बेड उपलब्ध करावा
  • रुग्णवाहिकांची अद्ययावत माहिती या समन्वयकांकडे असावी
  • गरजू रुग्णाला तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी

सिंगल विंडो कक्षासाठी समन्वयक म्हणून जबाबदार अधिकारी नियुक्त करावा. शिवाय, या कक्षाकडे दर तासाला सर्व रुग्णालयांतील उपलब्ध बेड, तत्काळ रुग्णवाहिका कोठे मिळू शकेल, याबाबतची ऑनलाइन अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचे बंधन संबंधित सर्व रुग्णालयांवर घातले पाहिजे; अन्यथा ग्रामीण भागातील रुग्ण उपचारापासून कायम वंचितच राहण्याचा धोका वाढला आहे.
- शरद बुट्टे पाटील, भाजप गटनेते, जिल्हा परिषद, पुणे 

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना शहरातील रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बेड उपलब्धतेसाठी सिंगल विंडो पद्धतीचा अवलंब होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेने तशी मागणी केली आहे. 
- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com