कास - जावळीत विरोधकांना संजीवनी.... तर भाजपला नडला अति आत्मविश्वास...

कास - जावळीत विरोधकांना संजीवनी.... तर भाजपला नडला अति आत्मविश्वास...

Published on

जावळी तालुका
............................

राष्ट्रवादी- शिवसेनेला नवसंजीवनी;
भाजपला नडला अतिआत्मविश्वास


कास, ता. १० : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जावळी तालुक्याचा निकाल विरोधकांना दिलासा देणारा, तर सत्ताधारी भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. विरोधातील शिवसेना व राष्ट्रवादीला या निकालाने तालुक्यात नवसंजीवनी मिळाली असून, भाजपला अतिआत्मविश्वास नडल्याचे दिसून येते. जावळीतील जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या सहा गणांपैकी भाजपने दोन गट व तीन गणांत विजय मिळवला. विरोधी शिवसेनेने एक गट व दोन गण, तर राष्ट्रवादीने एका गणातील जागेवर विजय मिळवला.

पंचायत समितीवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना तीन -तीन असे समान बलाबल झाल्याने तालुक्यात महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेली पंचायत समिती प्रथमच हातातून जाण्याचा धोका दिसत आहे. या निवडणुकीपूर्वी तालुक्यात विरोधकच नसल्याचे बोलणाऱ्या भाजपला या निवडणुकीनंतर मात्र शिवसेना व राष्ट्रवादीचे कडवे आव्हान उभे राहिले.
म्हसवे गटात तालुक्याचे नेते असणारे वसंतराव मानकुमरे हे विजयी होतील, अशी खात्री असल्याने त्यांनी कुणबीच्या दाखल्यावर ओबीसीतून लढवले गेले, तरीही शिवसेनेच्या संदीप पवार यांनी तेथे मानकुमरेंना प्रचारात गुंतवून ठेवत गटापुरते मर्यादित केले. श्री. मानकुमरे यांना गटात अडकून पडावे लागेल इतका संघर्ष तेथे शिवसेनेने केला. या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्यांचे बंधू ऋषीभाई शिंदे, अंकुश कदम यांनी प्रचारात आघाडी घेतली. शशिकांत शिंदेंनी म्हसवे गणात ताकद लावून गावाचा बालेकिल्ला राखला.
खर्शी बारामुरे गण भाजपने जिंकला असला, तरी राष्ट्रवादीच्या विठ्ठल गोळे यांनी तेथे घेतलेली मते दुर्लक्षित करून चालणार नाही. धरणग्रस्तांचे प्रश्न, स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष यामुळे श्री. मानकुमरे यांच्या विरोधात मतदान यंत्रातून रोष दिसून आला. भविष्यात श्री. मानकुमरे यांना या ठिकाणी संघर्ष करावा लागू शकतो.
कुडाळ गट हा गेल्या तीनवेळा दीपक पवार यांचा बालेकिल्ला होता; परंतु या वेळी या ठिकाणी भाजपने गटातील उमेदवारी राजकीय अनुभव असणाऱ्या सुहास गिरी यांच्या पत्नी जयश्री गिरी यांना दिल्यामुळे तेथील लढत एकतर्फी झाली. गिरी मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. कुडाळ गणातही सौरभ शिंदे सहज निवडून आले. या ठिकाणी प्रतापगड कारखान्यामुळे शिंदे कुटुंबांचे असलेल्या लोकसंपर्कामुळे ही निवडणूक सोपी झाली. सायगाव गणात सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने तेथे फारशी चुरस दिसली नाही. भाजपच्या चारुशीला पवार या विजयी झाल्या, तरीही कुडाळ गणात विरोधकांनी घेतलेली मते विचारात घेण्यासारखी आहे. भविष्यात त्या ठिकाणी चांगला उमेदवार असल्यास भाजपला निवडणूक साेपी राहणार नाही, हे नक्की. दीपक पवार यांनी यावेळी गटात फारसे लक्ष न दिल्याचा फटकाही राष्ट्रवादीला बसला.
कुसुंबी गटातील निकाल धक्कादायक ठरला. तेथे गट व गण शिवसेनेला सोडल्यामुळे एका ठिकाणी संपूर्ण ताकद शिवसेनेला लावण्यात यश आले. मेढा नगरपंचायतीत भाजपला प्रबळ विरोधक म्हणून उभे राहिलेले अंकुश कदम यांनी या गटात लक्ष घालून तालुक्याचे नेते ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा केलेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. जिल्हा बँकेत शशिकांत शिंदेंना ज्ञानदेव रांजणे यांनी रोखले होते. त्याच श्री. शिंदे यांनी केळघरमध्ये सांगता सभा घेत शेवटच्या क्षणी वातावरण फिरवत जिल्हा बँकेतील पराभवाची परतफेड केल्याचे बाेलले जाते.
शिवसेना, राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले नसले, तरी तालुक्यात पुन्हा सक्रिय होण्याइतपत बळ या निवडणुकीतून मिळाले आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांना आगामी काळात याेग्य लाेकांची निवड करूनच रणनीती ठरवावी लागेल, हे नक्की.
...................
चाैकट
.............

यामुळे आले भाजपला अपयश...

* चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अतिविश्वास नडला.
* सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयश
* शिवेंद्रसिंहराजे तालुक्यात आल्यावरच त्यांच्या मागे-पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत मतदारांत नाराजी
* काही ठराविकांनाच पुन्हा संधी
* स्थानिक पातळीवर भाजपच्या नेत्यांच्या प्रचारात एकजिन्सीपणाचा अभाव
* इच्छुकांना न विचारल्याची सल
* भाजपची रसद चुकीच्या लोकांच्या हाती
* माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांचा ऐनवेळी पक्षप्रवेश पचनी पडला नाही.
..............


शिवसेना, राष्ट्रवादीच्या यशाची कारणे

* मेढा नगरपंचायतीच्या निकालानंतर एकत्र आल्यास भाजपला हरवू शकतो, हा आत्मविश्वास
* एकत्र लढण्याने टळले मतविभाजन
* शशिकांत शिंदे, अंकुश कदम, एकनाथ ओंबळे, दीपक पवार आदी नेत्यांचे एकत्रित जुळलेले सूर ठरले लाभदायी
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या केळघरमधील सभेचा परिणाम
* राष्ट्रवादीचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढल्याने मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झाले सक्रिय
* १९९५ नंतर शिवसेनेला गुलाल मिळाल्याने कार्यकर्ते चार्ज
* अंकुश कदम यांच्या रूपाने आक्रमक व युवा नेतृत्व
* दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचाही फायदा
.........................

चौकट
...........
तालुक्यात पुन्हा उभारी

शिवसेना व राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर तालुक्यात दोन्ही पक्षांची बिकट अवस्था झाली होती. शिवसेना शिंदे गटाकडे एकनाथ ओंबळे सोडून एकही चेहरा नव्हता. राष्ट्रवादीकडे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होते, तरीही कार्यकर्त्यांची फळी उभारत दोन- तीन वर्षांत तालुक्यात पुन्हा पक्षाला उभारी देण्यात यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
................................


शिवेंद्रसिंहराजे भोसले,
शशिकांत शिंदे,
अंकुश कदम,
एकनाथ ओंबळे,
वसंतराव मानकुमरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com