

जेजुरी, ता. २५ ः जेजुरी औद्योगिक वसाहतीची स्थापना १९८५मध्ये करण्यात आली. जेजुरी औद्योगिक क्षेत्र २३१ हेक्टर क्षेत्रावर विकसित केले आहे. वसाहतीत आपत्कालीन सुविधा व अग्निशमन यंत्रणेची वानवा आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतःची अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये दुर्घटना घडल्यास जेजुरी अथवा सासवड नगरपालिकेच्या अथवा इतर ठिकाणच्या अग्निशमन गाड्या बोलवाव्या लागतात. परिणामी वेळ वाया जातो.
जेजुरी औद्योगिक वसाहतीत छोट्या कंपन्यांची संख्या सर्वात जास्त आहे. परिणामी वसाहतीचा विस्तार व पुरेशा कामगारांना कामाची संधी मिळत नाही. जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये नियोजनानुसार रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये अद्यापही काही सुधारणा होणे आवश्यक आहे. रस्त्यावर जागोजागी फलक लावणे आवश्यक आहे. सांडपाण्यासाठी काही ठिकाणी बंदिस्त गटारे आहेत तर काही ठिकाणी उघड्यावर गटारे आहेत. पावसाचे पाणी काढून देण्यासाठी जागोजागी नियोजन करणे आवश्यक आहे.
पाण्याची उपलब्धता, रस्त्यांची झालेली सोय पाहता जेजुरी परिसरात उद्योग व्यवसाय वाढीला मोठी संधी आहे. अर्धवट बांधकाम झालेले व बंद पडलेल्या उद्योगाच्या जागेवर नवीन उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने व्यवसाय विस्तारीकरणाचा आढावा घेणे आवश्यक आहे.
आर्थिक नुकसान
वीज पुरवठ्याबाबत नवीन कंपन्यांना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. मध्येच वीज गायब होत असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. गेला महिनाभर वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत आहे. त्यामुळे उद्योगांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. रस्त्यावर काही ठिकाणी पथदिवे आहेत. मात्र काही मार्ग अद्याप मोकळेच आहेत. सुरक्षिततेसाठी सर्वत्र पथदिवे बसविणे आवश्यक आहे.
औद्योगिक वसाहतीची स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. कंपनीमध्ये रात्रीच्यावेळी चोरीच्या सतत घटना घडत असतात. रात्रीच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. जेजुरी औद्योगिक वसाहतीत अग्निशमन यंत्रणा हवी.
-डॉ. रामदास कुटे, अध्यक्ष, उद्योजक संघटना
जेजुरी औद्योगिक वसाहत ही इंजिनिअरिंग विभागासाठी राखीव असल्यामुळे प्रदूषण करणारे कारखाने जेजुरीमध्ये नाहीत. औषध उत्पादनासारखे काही कारखाने कचरा प्रक्रीया करण्याची स्वतंत्र व्यवस्था करतात. येथील उद्योग वाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे.
-पांडुरंग सोनवणे, उद्योजक
उद्योगांना दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यासाठी महामंडळाचा प्रयत्न आहे.
-एस. एस. कदम, उप अभियंता, जेजुरी औद्योगिक वसाहत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.