

विद्यार्थी आंदोलनाला राजकीय रंग
आंदोलकांवरील भाजपच्या प्रभावाचा झारखंड सरकारचा आरोप; भाजपकडून राहुल लक्ष्य
रांची, ता. १० (वृत्तसंस्था) : भरती परीक्षेतील गैरप्रकारांवरून झारखंडमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाला राजकीय रंग मिळाला आहे. हे आंदोलन भाजपने हायजॅक केले आहे, असा आरोप झारखंड सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात येत आहे. तर, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच दिल्ली आंदोलनावेळी सक्रिय असणारे नेते आता का मौन बाळगत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्लीतील आंदोलनामध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपविरोधात राळ उडविली होती. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन केले होते. आता झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. आता या सरकारच्या कार्यकाळातील परीक्षांमधील गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात येत आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावर काँग्रेस नेते राहुल गांधी दुटप्पी भूमिका घेत आहेत. दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हायजॅक कऱण्याचा प्रयत्न करणारे झारखंडमधील आंदोलनावर तोंडात मीठाची गुळणी धरून बसले आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी केली. ते म्हणाले, ‘‘काही जण दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा उचलत ते हायजॅक करण्याचा प्रयत्न करत होते. ते प्रचंड अस्वस्थ होते, काही वेळ बसमध्ये बसत होते, काही वेळ पायी चालत होते, आता ते कथित नेते कुठे आहेत?’’ ‘‘आज लोकशाहीसाठी काळा दिवस होता. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठ्या उगारल्या. अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी असंवेदनशील आहेत,’’ असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष शशांक राज यांनी म्हटले आहे.
तर, झारखंड सरकारमधील मंत्री सुदिव्यकुमार सोनू म्हणाले, ‘‘भाजपने त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी हे आंदोलन हायजॅक केले आहे. सरकारने ९५ टक्के मागण्या पूर्ण केल्यानंतरही आंदोलक अजूनही आंदोलन करत आहेत.’’ विधानसभेमध्येही या आंदोलनावर चर्चा झाली. तेथे सुदिव्यकुमार म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांचे असणाऱ्या या आंदोलनावर आता भाजपचा पूर्ण प्रभाव आहे. त्यामध्ये भाजपची राक्षसी मानसिकता आणि राजकीय आराखडा दिसत आहे.’’
सीबीआय तपासाची मागणी
या आंदोलनात विद्यार्थी तिरंग्यांसह सहभागी झाले होते. ‘झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द करा किंवा सीबीआय तपास करा’, ‘झारखंड लोकसेवा आयोगावर छापे टाकण्याचे सीआयडी का टाळत आहे’, ‘निष्पक्ष तपास करा आणि सत्य बाहेर आणा’ अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते.
विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना
पोलिसांच्या लाठीमारानंतर जखमी झालेल्या आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. हजारीबाग जिल्ह्यातून या आंदोलनासाठी रांचीला आलेल्या विक्रमकुमारच्या डोक्याला जखमी झाली आहे. तो म्हणाला, ‘‘आमच्यासोबत हेमंत सोरेन यांचे सरकार ज्या पद्धतीने वागत आहे, ते चांगले नाही. आम्ही शांततेने आंदोलन करत असताना, पोलिस लाठीमार करत आहेत.’’ ‘आम्ही विधानसभेपर्यंत पोहोचू शकत नसलो, तरी आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हे सरकार आम्हाला देशद्रोह्याप्रमाणे वागवत आहे. आम्ही सरकारला घाबरत नाही. आम्हाला रस्त्यावर उतरणे भाग पडले आहे,’ अशी प्रतिक्रिया एका आंदोलकाने दिली. झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे आमदार जयराम महतो यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. ते म्हणाले, ‘विद्यार्थी शांततेने आंदोलन करत असताना, पोलिस त्यांना का रोखत आहेत? ते हातामध्ये काठ्या घेऊन तर आले नाहीत.’
सोरेन यांचा वाढदिवशी आंदोलन
विशेष म्हणजे हेमंत सोरेन यांचा सोमवारी ५१वा वाढदिवस आहे. त्याचे पडसादही या आंदोलनामध्ये पडले. एक आंदोलक म्हणाले, ‘‘आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता. आम्ही त्यांच्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करत होतो. मात्र, आम्हाला लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या मिळाल्या. आता आम्हाला स्पष्ट संदेश द्यायचा आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही.’’
‘ईडी’ तपासाला सुरुवात
झारखंडच्या भरती परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचा सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) तपास सुरू झाला आहे. सीआयडीकडे नोंदविण्यात आलेल्या फिर्यादीवरून हा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, अन्य तक्रारी व आरोपपत्रांमधील नोंदींचाही या तपासामध्ये वापर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात येते. आता ‘ईडी’ तपासाची व्याप्ती वाढवत पुरावे गोळा करणार असल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या घडामोडी
- आंदोलकांविरोधात बळाचा वापर करू नये, अशी सक्त ताकीद पोलिसांना दिली होती : पोलिस उपायुक्त अजय आर्यन
- आंदोलनात समाजविघातक घटक घुसू नये, म्हणून ५०० स्वयंसेवक तैनात
- विद्यार्थी सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम
- मागण्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आंदोलन थांबवतील : आमदार जयरामकुमार महतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.