पुण्यात एकाच दिवसात ७४० जणांना नोकरी 

पुण्यात एकाच दिवसात ७४० जणांना नोकरी 

पुणे - बेरोजगारीचे संकट निर्माण झालेले असताना पुण्यात आज एकाच दिवसात ७४० जणांना नोकरी मिळाली. ‘जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र’ आणि ‘एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स’यांच्या तर्फे आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, ३ हजार २६१ पदांसाठी भरती असताना केवळ १ हजार ३६४ जणच या प्रक्रियेत सहभागी झाले होते. 

कर्वे रस्त्यावरील ‘एसएनडीटी’ कॉलेज ऑफ होम सायन्स’ येथील संकुलात शुक्रवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ३१ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यात ३ हजार २६१ पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार होत्या. दिवसभरात एकूण १ हजार ३६४ उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. त्यामध्ये ७४० प्रत्यक्ष रोजगार मिळाला. 

या मेळाव्याचे उद्‌घाटन ‘एसएनडीटी’ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्‍त अनुपमा पवार, ‘एसएनडीटी’च्या प्राचार्य डॉ. मुक्‍तजा मठकरी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर  उपस्थित होत्या.

  अनुपमा पवार म्हणाल्या, ‘एनएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या सहकार्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी हा मेळावा होत आहे. बेरोजगारांची संख्या खूप आहे. ज्या पदांसाठी जास्त शिक्षणाची गरज नाही अशा रोजगाराची गरज आहे. त्यातून सकारात्मक संदेश समाजात जाईल. या उपक्रमात काही त्रुटी असतील तर त्यात सुधारणा केल्या जातील. रोजगार मेळाव्यातून विश्‍लेषणात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे. 

प्राचार्य डॉ. मुक्‍तजा मठकरी म्हणाल्या, एसएनडीटी विद्यापीठाची भूमिका ही नेहमीच समाजाभिमुख राहिली आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com