

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतदेह
बाहेर काढण्याची मोहीम सुरू
चमोली, ता. ३१ (पीटीआय) : जोशीमठ येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तैनात केलेली पथके शनिवारी घटनास्थळी पोहोचली आहेत. दुर्गम आणि डोंगराळ भागातून हे मृतदेह जवळच्या रस्त्यापर्यंत आणण्यासाठी सध्या एक व्यापक मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी (ता. ३०) दुपारी बद्रीनाथहून भाविकांना घेऊन जाणारे एक खासगी हेलिकॉप्टर जोशीमठमधील डोंगराळ भागात कोसळले. ढगाळ हवामानादरम्यान घडलेल्या या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारीच वैमानिक अन् कर्नाटकचे पाच भाविक अशा एकूण सहा जणांचे मृतदेह सापडले होते. मात्र, अंधार, श्वापदांचा धोका अन् अतिदुर्गम भूप्रदेशामुळे शुक्रवारी बचाव मोहीम थांबवण्यात आली होती. आता हे पथक पांडुकेश्वरच्या दिशेने कठीण डोंगराळ मार्गावरून प्रवास करत अपघातस्थळी पोहोचले असून, आता मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही संयुक्त मोहीम आज पहाटे सुरू झाली. मात्र, चमोली जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातस्थळ अत्यंत दुर्गम आणि उंचावरील डोंगराळ भागात असल्याने, तिथून मृतदेह जवळच्या रस्त्यापर्यंत आणणे मोठे आव्हानात्मक खडतर काम आहे. बचाव पथकातील एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले, की मृतदेह रस्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही तासांचा कालावधी लागू शकतो. परतीच्या प्रवासासाठी जवळच्या गावांतून पर्यायी मार्ग शोधले जात आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी संध्याकाळपर्यंत मृतदेह जोशीमठ येथे पोहोचण्याची शक्यता आहे. भूभाग अतिदुर्गम व हवामान प्रतिकूल असल्याने या मोहिमेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
कर्नाटक सरकार उत्तराखंडच्या संपर्कात
बंगळुर : हेलिकॉप्टर दुर्घटनेत कर्नाटकातील पाच पर्यटकांचा मृत्यू झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळावी यासाठी राज्य सरकार उत्तराखंड प्रशासनाशी समन्वय साधत असल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेत बंगळूर पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेतील (सीसीबी) निरीक्षक अरुण साळुंखे यांच्यासह हसन येथील व्यावसायिक प्रताप, वकील शंकर गौडा आणि सुधीर के. तसेच पोल्ट्री व्यावसायिक एच. एस. नटराज यांचा समावेश आहे. हेलिकॉप्टरचे वैमानिक कॅप्टन हिमांशू यांचाही मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.