पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या वापराची वेळ येऊ नये; उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

जम्बो कोविड सेंटरचे उदघाटन झाले तरी, प्रत्यक्षात रुग्णांना येत्या मंगळवारपासून उपचार मिळणार आहेत, असे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.

पुणे, ता. 23 : रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेले कोविड केअर सेंटरची सुविधा फायदेशीर ठरेल; मात्र एवढ्या किमतीची ही सुविधा तशीच कोरी करकरीत राहावी. पुणेकरांसाठी तिचा वापर करण्याची वेळ ओढवू नये आणि पुणेकर सुरक्षित राहावेत, अशाच शब्दात गणरायाला साकडे घालत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेकरांना शुभेच्छा दिल्या आणि कोरोनाचे विसर्जन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. मात्र, संकट टळलेले नसल्याचे सूचित करीत, खबरदारी म्हणून आरोग्य सुविधांचे जाळे विस्तारण्याचा शब्दही ठाकरे यांनी दिला. 

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे ऑनलाइन उदघाटन मुख्यंमत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ आमदार सिध्दार्थ शिरोळे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, "पीएमआरडीए'चे सीईओ सुहास दिवसे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम उपस्थितीत होते. 

ठाकरे म्हणाले, ""कोरोनाची साथ पुन्हा वेगाने पसरू शकते, त्यासाठी खबदारीचे उपाय हवेत, म्हणून पुण्यातील जम्बो कोविड सेंटरसारख्या यंत्रणा उभारल्या आहेत. परंतु, सध्याचा दिवस हे उत्सवाचे आहेत. त्याशिवाय व्यवहार सुरू झाल्याने सर्वत्र गर्दी होत आहे. त्यामुळे सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. '' 

""गणेशोत्सव साजरा करण्याची थोडीशी परंपरा बाजूला करीत पुणेकरांनी उत्सवाला प्रारंभ केला आहे. याच काळात अन्य सणही साधेपणाने होत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. त्याबद्दल पुणेकरांचे खरोखरीच कौतुक आहे. या स्थितीत पोलिसांनीही चांगली कामिगरी केली आहे. दुसरीकडे, पाऊस आणि अन्य अडचणी असूनही कमीत-कमी कालावधीत सेंटर उभे राहिले, ही मोठी कामगिरी आहे,'' असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुणेकरांसह सरकारी यंत्रणांनाही शाबासकी दिली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जम्बो कोविड सेंटरचे उदघाटन झाले तरी, प्रत्यक्षात रुग्णांना येत्या मंगळवारपासून उपचार मिळणार आहेत, असे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. सेंटरमधील सुविधांचे निर्जतुकीकरण करण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे लगेचच रुग्णांना घेता नाही. त्यामुळे सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jumbo covid 19 center inauguration in pune by cm uddhav Thackeray