"जम्बो कोविड केअर सेंटर'मध्ये दोन दिवसांत नवीन 125 बेड उपलब्ध होणार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

पुढील काही दिवसांत बेड कमी पडण्याच्या शक्‍यतेने त्या वाढविण्याचा निर्णय महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी बुधवारी घेतला.त्यानुसार गुरुवारी आणि शुक्रवारी बेड उपलब्ध होणार आहेत. 

पुणे- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील "जम्बो कोविड केअर सेंटर'मध्ये दोन दिवसांत नवीन 125 ऑक्‍सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे येथे एकावेळी 475 रुग्णांवर उपचार करणे शक्‍य होणार आहे. 

गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी जम्बो कोविड केअर सेंटरची क्षमता 800 असली तरी; प्रत्यक्षात मात्र तेथे 350 बेडच उपलब्ध आहेत. त्यात 300 ऑक्‍सिजन आणि 50 अतिदक्षता विभाग (आयसीयू) बेडचा समावेश आहे. याबाबत "सकाळ'ने पहिल्यापासूनच प्रकाश टाकला आहे. त्यामुळे "जम्बो'त सुविधा वाढविल्या आहेत. दरम्यान, उपचारानंतर रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढली आहे. पुढील काही दिवसांत बेड कमी पडण्याच्या शक्‍यतेने त्या वाढविण्याचा निर्णय महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी बुधवारी घेतला. त्यानुसार गुरुवारी (ता. 10) 50 आणि शुक्रवारी (ता. 11) 75 बेड उपलब्ध होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्येक रुग्णाची विचारपूस 
नव्या प्रयत्नांमुळे "जम्बो'च्या कामकाजात सुधारणा होऊ लागल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, गेल्या चार दिवसांत 60 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. या रुग्णांवर किमान दहा ते बारा दिवस उपचार केले असून, घरी गेल्यानंतरही प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस केली जात असल्याचे "जम्बो'चे समन्वय राजेंद्र मुठे यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जम्बोतील सद्यः स्थिती 
300  - सध्याचे ऑक्‍सिजन बडे 
50  - आयसीयू बेड 
125  -  नवीन उपलब्ध होणारे बेड 
137  - दाखल रुग्ण 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने अत्यवस्थ रुग्णांसाठी ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. ती पूर्ण करण्यासाठी आणखी 125 रुग्णांना सामावून घेण्यासाठी यंत्रणा उभी करीत आहोत. ज्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणार आहेत. 
- रुबल अग्रवाल,  अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jumbo Covid Care Center will have 125 new beds in two days