धक्कादायक! आधी म्हणाले रुग्ण इथं नाही आणि नंतर मृत्यूची बातमी; कोविड सेंटरमध्ये जिवाशी खेळ

प्रमोद शेलार
Wednesday, 2 September 2020

हतबल झालेल्या नातेवाईकांनी आता किमान दोघांना मृतदेहाचा चेहरा तरी दाखवा अशी विनंती केली आहे.

पुणे - कोरोनाचे सर्वाधिक सक्रीय रुग्ण असलेल्या पुण्यात कोविड सेंटरमधील भोंगळ कारभाराचे अनेक प्रकार समोर येत आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात गरवारे कॉलेजमध्ये असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या एका रुग्णाला जम्बो रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर तीन दिवस रुग्णालय प्रशासनाकडून इथं तुमचा रुग्णच नाही अशी माहिती नातेवाइकांना दिली. अचानक मंगळवारी रात्री नातेवाईकांना फोन करून तुमचा रुग्ण दगावल्याची बातमीच सांगितली. प्रशासनाचा कारभार एवढ्यावर थांबला नाही तर दुसऱ्या दिवशीही मृतदेह ताब्यात देणं दूरच पण साधी माहितीही नातेवाईकांना दिली नाही.

पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता जम्बो कोविड सेंटरमधील अशा बेजबाबदार कारभारानंतर उपस्थित केला जात आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं म्हणत नातेवाईकांना संतप्त भावना व्यक्त केल्या. सकाळशी बोलताना नातेवाईकांनी त्यांची व्यथा सांगितली. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर गरवारे इथं असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णाला 7 दिवस ठेवण्यात आलं होतं. मात्र तब्येत बिघडल्यानं 4 दिवसांपूर्वी शिवाजीनगर इथं असलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं. दरम्यान, ही सर्व प्रक्रिया करत असताना रुग्णांच्या नातेवाईकांना कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. यामुळे नातेवाईक रुग्णाचा शोध घेत होते. नातेवाईकांनी जवळपास तीन दिवस शोधाशोध केली तरीही त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. 

नातेवाईकांनी रुग्णाबाबत चौकशी केली असता त्यांना रुग्ण कोविड सेंटरमध्ये नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर अचानक मंगळवारी रात्री नातेवाईकांना फोन करून तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे अशी बातमी देण्यात आली. आठवडाभर आधी धावपळ करून कोणतीच माहिती न मिळाल्यानं खचलेल्या नातेवाईकांना हा मोठा धक्का होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा तो दाखवण्यास आणि ताब्यात देण्यासही नकार देण्यात आला. यामुळे हतबल झालेल्या नातेवाईकांनी आता किमान दोघांना मृतदेहाचा चेहरा तरी दाखवा अशी विनंती केली आहे. 

कोविड सेंटरबाबत अनेक तक्रारी
शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या जंबो कोवीड सेंटरचा बेजबाबदार कारभाराबाबत नातेवाईकांच्या अनेक तक्रारी येत आहे. ''माझी आई 84 वर्षाची आहे, खासगी रुग्णालयात कुठेही आयसीयू बेड मिळत नाहीये, त्यामुळे तिला जंबो कोवीड सेंटरमध्ये दाखल करुन घेण्याशिवाय पर्याय नाही. येथे कोणतीही सुविधा व्यवस्थित दिल्या जात नाहीयेत. आम्हाला ती कशी आहे, तीची काय स्थिती आहे काहीच सांगत नाही. गेल्या तीन दिवसांपासून तिला अंघोळ नाही, ना काही नाही ''अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jumbo COVID centre shivajinagar pune many complaints