Leopard Cubs : आईच्या कुशीत पुन्हा विसावणाऱ्या बछड्यांचे शतक!

वनविभाग व वाइल्ड लाइफ एसओएस संस्थेने गेल्या १४ वर्षांत बिबट्याच्या शंभर बछड्यांना पुन्हा आईच्या कुशीत सोपविण्याची किमया केली आहे.
Leopard Cubs
Leopard CubsSakal
Summary

वनविभाग व वाइल्ड लाइफ एसओएस संस्थेने गेल्या १४ वर्षांत बिबट्याच्या शंभर बछड्यांना पुन्हा आईच्या कुशीत सोपविण्याची किमया केली आहे.

जुन्नर - वनविभाग व वाइल्ड लाइफ एसओएस संस्थेने गेल्या १४ वर्षांत बिबट्याच्या शंभर बछड्यांना पुन्हा आईच्या कुशीत सोपविण्याची किमया केली आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथे ३ डिसेंबर रोजी उसाच्या शेतात आढळून आलेल्या बछड्याची आईबरोबर अवघ्या चार तासात पुनर्भेट घडवून आणून या भेटीचे शतक पूर्ण झाले.

पुणे, नगर, नाशिक, सातारा जिल्ह्यात आढळून आलेल्या बिबट्याच्या पिल्लांना त्यांच्या आईकडे सुपूर्द केले असले; तरी त्यातील सुमारे ८० बछडे पुणे जिल्ह्यातील असून, सर्वाधिक संख्या जुन्नर तालुक्यातील बछड्यांची आहे. आईच्या काळजाचा तुकडाच तो पुन्हा आईच्या कुशीत विसावताना आई आणि पिल्लास होणाऱ्या आनंदाचे साक्षीदार होण्याचे भाग्य कर्मचाऱ्यांना लाभले आहे. गेल्या काही वर्षात राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पथकाने पंधरा दिवसापासून ते तीन महिने वयाच्या पिल्लांची आईशी भेट घडवून आणली आहे, अशी माहिती माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक महेंद्र ढोरे यांनी सांगितले.

बिबट्यांपुढील संकटे

पुणे जिल्ह्यात ऊस शेती ही बिबट्याचे आश्रयस्थान झाले आहे. मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यातून भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडणे, रस्ता ओलांडताना वाहनांची धडक बसून जखमी होणे, कोंबड्याच्या खुराड्यात, घरात अडकणे, अशा संकटांना बिबट्यांना सामना करावा लागतो. त्यासाठी सतत रेस्क्यू ऑपरेशन सुरू असते.

धोलवडमध्ये पहिले यश

ऊस तोडणीच्या हंगामात जानेवारी २००९ मध्ये धोलवड (ता. जुन्नर) येथील शेतात बिबट्याचा बछडा मिळून आला होता. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात आणून ठेवले व पुन्हा संध्याकाळी त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. त्यावेळी बिबट मादी त्यास घेऊन गेली. ही अधिकृत नोंद झालेली पहिली घटना आहे. जुन्नर तालुक्यात सन २००२ पासून बिबट समस्या निर्माण झाली आहे. तेव्हादेखील अशा पिल्लांना आईकडे सुपूर्द करण्यात आले होते.

शेतकऱ्यांची बदलली मानसिकता

पूर्वी शेतात बिबट्याचा बछडा मिळाला की संबंधित शेतकरी, ‘त्याला घेऊन जा व बछड्यास पुन्हा येथे आणू नका,’ असे सांगत. त्यांच्या दृष्टीने पिल्लू गेले की मादीदेखील आपोआप येथून निघून जाईल. वाइल्ड लाइफ एसओएस व जुन्नर वन विभागाने शेतकऱ्यांना समजावून सांगितले की, हे पिल्लू पुन्हा येथे मिळाले नाही; तर पिल्लाची व आईची भेट होणार नाही. पिल्लाची ताटातूट झाल्याने मादी आक्रमक होऊन संघर्ष वाढेल. लोकांना या बाबी हळूहळू समजू लागल्या. त्यामुळे आता, ‘ज्या ठिकाणी पिल्ले मिळतात, तेथेच पिल्ले ठेवा,’ असे शेतकरी सांगू लागला आहे. पिल्लाची व आईची भेट झाली, तर मादी शांत होते व ती जागा बदलते, याची जाणीव शेतकऱ्यास झाली आहे. हा बदल होण्यास फार मोठा कालावधी गेला. त्यामुळे आता जुन्नर तालुक्यात बिबट-मानव संबंध संघर्षातून सहजीवनाकडे वाटचाल करत आहे.

अशी होते पिल्लाची आईशी भेट

उसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळून आल्यास प्रथम त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून नंतर बिबट निवारा केंद्रात नेण्यात येते. पिल्लू आजारी असल्यास त्यावर उपचार करण्यात येतात. सुदृढ व वयाने मोठे असणाऱ्या पिल्लांच्या शरीरात इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्यात येते. यामुळे पिल्लू दुसरे कुठे सापडल्यास नोंदी सापडण्यास मदत होत असते. पिल्ले ज्या ठिकाणी सापडले, तेथे सूर्यास्ताच्या वेळी पिल्लांना बॉक्समध्ये ठेवून चारही बाजूने कॅमेरे लावतात. येथे काही तासात मादी बिबट येऊन बॉक्सला धक्का देऊन पिल्लांना बाहेर काढते व सोबत घेऊन जाते. काही घटनांमध्ये यास तीन ते चार दिवस लागू शकतात. मात्र, पिल्लू आईच्या कुशीत विसावेपर्यंत रोज हाच उपक्रम करावा लागतो. बऱ्याच वेळी आई पिल्लाला स्वीकारते, मात्र अपवादात्मक स्थितीत स्वीकारले नाही; तर उर्वरित आयुष्य पिल्लास अनाथालयात काढावे लागते.

वनविभागाने सातत्याने शेतकऱ्यांसाठी केलेल्या जनजागृतीच्या उपक्रमामुळे ग्रामस्थांची मानसिकता बदलण्यास मदत झाली. त्यामुळे आता आता शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले की ते वनविभागाशी संपर्क साधतात. बिबट मादीस पिल्लू मिळाले नाही; तर ती आक्रमक होईल, याची जाणीव ग्रामस्थांना झाली आहे. त्यामुळे आता शेतकरी लगेच वन विभागास फोन करून कळवितात.

- अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी

बिबट मादीने बछड्यास घेऊन जाण्याच्या धोलवड येथील प्रयोग म्हणून केलेल्या पहिल्याच यशस्वी घटनेनंतर वनविभाग व वाइल्ड लाइफ एसओएसकडून आई व पिल्लाच्या पुनर्भेटीचा अभ्यास सुरू करण्यात आला. याच्या अद्ययावत नोंदी ठेवण्यात येऊ लागल्या. सुरवातीच्या काळात आजच्यासारखे आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. कॅमेरा ट्रॅपमध्ये रात्री चांगले फोटो येत नसत. बिबट्याच्या पायाचे ठसे, विष्ठेच्या आधारे पुरावे गोळा केले जात. आता मात्र बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांची पिल्ले आणि आईच्या भेटीची पुनर्भेटीची प्रक्रिया निश्चित झाली आहे.

- महेंद्र ढोरे, प्रकल्प व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com