Junnar : तक्रार मागे घ्यावी म्हणून जुन्नरला वडापाव विक्रेत्याला लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लुटले

Junnar : तक्रार मागे घ्यावी म्हणून जुन्नरला वडापाव विक्रेत्याला लुटले

जुन्नर : पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी अक्षय मोहन बोऱ्हाडे रा.शिरोली बुद्रुक याने साथीदारासह जुन्नर येथील वडापाव विक्रेत्यास मारहाण करून लुटले.वडापाव विक्रेत्याच्या गळ्यातील सोन्याची पाच तोळ्यांची सोन्याची चेन व गल्ल्यातील रोकड लुटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून बोऱ्हाडे याचे विरुद्ध जुन्नर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

जुन्नर पोलीस स्टेशन पासून जवळच भर बाजार पेठेत असलेल्या सुखप्रदा वडापाव सेंटरच्या हातगाडीवर शनिवार ता.२४ रोजी सायंकाळी घडलेल्या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत संतोष शंकरराव खोत यांनी जुन्नर पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. अक्षय बोऱ्हाडे याचे विरुद्ध व्हिडीओ वायरल प्रकरणी चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल आहे. संतोष याचा भाऊ बल्ली त्यावेळी तेथे होता. हातगाडीवरील सामानाची आवरा आवर करत असताना बोऱ्हाडे येथे आला.हातातील चाकू संतोषवर उगारत तुझा भाऊ बल्ली कोठे आहे सांग, त्याला जास्त माज आला आहे का ? माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली ती त्यास माघारी घेण्यास सांग.याला आता संपून टाका असे म्हणून त्याच्या हातातील चाकू संतोष यास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारताना मानेला लागला. यावेळी त्याच्या दोन साथीदारांनी

छातीवर व मानेवर पाय देऊन गळ्यातील सोन्याची पाच तोळ्याची चैन काढून घेतली व वडापावच्या विक्रीचे गल्ल्यातील सुमारे सात हजार रुपये अक्षय बोऱ्हाडे याने काढून घेतले त्याचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेले लोक तेथे येत असल्याचे पाहून आरोपीनी पलायन केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.