कडकनाथ कोंबडी पालन आर्थिक घोटाळ्याचे लोण पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याचे लोण पुणे शहरातही पसरले आहे. कमी पैशात दुप्पट उत्पन्न अशी जाहिरात करून महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शहरातील ६६ जणांना १ कोटी ७३ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात एकाने फिर्याद दिली असून कंपनीच्या रोखपालला अटक करण्यात आली आहे.

पुणे : कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याचे लोण पुणे शहरातही पसरले आहे. कमी पैशात दुप्पट उत्पन्न अशी जाहिरात करून महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शहरातील ६६ जणांना १ कोटी ७३ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात एकाने फिर्याद दिली असून कंपनीच्या रोखपालला अटक करण्यात आली आहे.

प्रीतम माने असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर कंपनीचे अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहित (दोघेही रा. इस्लामपूर, 
सांगली ) यांच्यासह हनुमंत शंकर जगदाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश शिवाजी आंबेडे (वय ३५, रा. दत्तवाडी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी पैशांची गुंतवणूक करून दुप्पट उत्पन्न अशी महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने कडकनाथ कोंबडी पालनाची जाहिरात केली  होती. त्यानुसार नागरिकांनी  कंपनीत गुंतवणूक केली होती. त्यामध्ये आंबेडे यांनी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायासाठी संबंधित कंपनीकडे २ लाख ५० हजारांची गुंतवणूक केली. कंपनीच्यावतीने त्यांना ३०० कडकनाथ कोंबडी पक्ष्यांचे वितरण करून त्यांचे खाद्य, लस, भांडी, डॉक्टर भेट, व्यवस्थापनाचा समावेश होता. मात्र, संबंधित कंपनीने आंबेडे यांना भूलथापा दिल्या. पैसे जमा करूनही महारयत ऍग्रो इंडिया प्राय व्हेट लिमिटेड कंपनीने आंबेडे यांना कडकनाथ कोंबडी पालनासाठी पिल्ले न देता फसवणूक केली. तसेच ६६ नागरिकांनी कडकनाथ कोंबडी पालनात फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित कंपणीविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे अधिक तपास करीत आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadaknath chicken rearing financial scandal in Pune