Malegaon News : बारामती तालुक्यातील कांबळेश्वर झाले विधवामुक्त गाव

बारामती तालुक्यात आज पहिले कांबळेश्वर विधवा मुक्त गाव झाले. परिणामी सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले.
Kambleshwar village
Kambleshwar villagesakal

माळेगाव - बारामती तालुक्यात आज पहिले कांबळेश्वर विधवा मुक्त गाव झाले. परिणामी सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले. विशेषतः सातारा जिल्ह्यानंतर प्रथमच पुणे जिल्ह्यातील पहिले क्रांतीकारक निर्णय घेणार कांबळेश्वर विधवा मुक्त गाव म्हणून पुढे आले.

यावेळी सरपंच मंदाकिनी शिवाजी कानडे यांनी गावात यापुढे सर्व महिलांना हाळदी-कुंकाचा मान मिळणार, विधवा महिलांनाही सुहासिनी म्हणून पुढे येता येणार आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात समधान व्यक्त केले.

कांबळेश्वर (ता. बारामती) ग्रामपंचायत आणि जयहिंद फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून आज (मंगळवारी) विधवा महिलांचा हळदी-कुंकाचा कार्य़क्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सरपंच मंदाकिनी कानडे बोलत होत्या.

यावेळी उपसरपंच गिरीष प्रकाश खलाटे, ग्रामविकास अधिकारी सुभाष चौधर, सदस्या सिमा खलाटे, मंगल कुंभार, प्रकाश खलाटे, जयहिंद फाऊंडेशनच्या स्नेहलता फडतरे, राजेंद्र जगताप, सचिन कुंभार, माजी सैनिक रविंद्र लडकत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान,सातारा जिल्ह्यातील नागझरी गावासह सात ते आठ गावांनी विधवा प्रथामुक्ती मिळविली आहे, असे सांगून जयहिंद फाऊंडेशनच्या स्नेहलता फडतरे म्हणाले,`पतीचे निधनानंतर त्यांच्या मागे पदरात एक दोन लेकर घेवून त्या एकट्या बाईने कसे जगायचे. याचा विचार झाला पाहिजे.

आपण केवळ पुरुष-महिला समानता म्हणतो आणि गावात अनिष्ठ प्रथा तशाच चालू ठेवतो, हे विधारक चित्र पुसून टाकण्यासाठी आणि विधवा मुक्त गाव होण्यासाठी बारामतीत पहिल्यांदा कांबळेश्वर गाव पुढे आले, याचे आम्हाला समाधान आहे.`

ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या कांबळेश्वर गावाने विधवा मुक्तीच्या आवाहनाला बहुतांशी गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला, त्यामुळे हा क्रांतीकारी निर्णय होऊ शकला, असे मत ग्रामविकास आधिकारी सुभाष चौधर यांनी व्यक्त केले. कांबळेश्वर ग्रामपंचायतीने अनिष्ट विधवा प्रथाबंदी बाबत ठराव केला.

या निर्णयाचे स्वागत करून शासनाने संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी करण्यासाठी पाऊल उचलावे, अशी अपेक्षा सदस्या सिमा खलाटे यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी विधवा प्रथाबंदी करण्याबाबत गावातील महिला व पुरुषांकडून चाचपणी करण्यात आली. सर्वच स्तरातून सकारात्मक प्रतिसाद आल्याने मंगळवारी कांबळेश्वर विधवा मुक्त गाव म्हणून ठराव केला. या ठरावाला उपस्थित महिलांनी हात वर करून संमती दिली.

इतकेच नव्हे तर उपस्थित विधवा महिलांचा सरपंच मंदाकिनी कानडे, स्नेहलता फडतरे यांनी हळदी कुंकू लावून सन्मान केला. पती निधनानंतर पहिल्यांदाच कपाळावर कुंकवाचा टिळा लावताना महिला भावुक झाल्या होत्या. या भावनिक वातावरणाने सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. विधवा महिलांना आदराचे स्थान देण्याचे व सर्व समारंभांमध्ये सामावून घेण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.

दुसरीकडे, विधवा होणे ही त्या महिलेची चूक नाही. त्यामुळे ही अनिष्ट रूढी सर्वत्र बंद होणे आवश्यक आहे. विधवांना सन्मान देण्यासाठी मुलीच्या लग्नात नवरीला हळदी लावण्याचा पहिला मान विधवांना देणार असल्याची ग्वाही अनेक महिलांनी यावेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com