

गुरूवारी पेस्टिंग
२०- शिवाजीराव जाधव यांच्या शेतातील लाल मिरचीचा तोडा. त्यावेळी डावीकडून बाळासाहेब जाधव, किरण जाधव, विष्णू जाधव, शिवाजीराव जाधव, लताबाई जाधव, कर्मचारी महिला, तुकाराम जाधव, ज्ञानोबा जाधव, रामराव जाधव आदी.
लाल मिरची उत्पादनात प्रसिद्ध झालेले कापसी
माणिक रासवे
.........................................................................
परभणी जिल्ह्यातील कापसी (ता.पालम) हे गाव लाल मिरची पिकविणारे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी मिरचीचे देशी वाण जोपासले आहे. जर्द लाल रंग आणि विशिष्ट चव असलेल्या या मिरचीने मुंबईचे मार्केट काबीज केले आहे. या नगदी पिकाच्या उत्पन्नातून गावातील शेतकऱ्यांच्या प्रगतीला दिशा मिळाली आहे. परिसरातील महिलांना रोजगार मिळाला आहे.
...........................................................................................................
परभणी जिल्ह्यातील पालम तालुका ठिकाणापासून आठ किलोमीटरवर कापसी गाव आहे. राज्यरस्त्यावरील केरवाडी जवळून उत्तर दिशेला फाटा फुटतो. तेथून दीड किलोमीटवर कापसी वसले आहे. या दोन्ही गावांची केरवाडी-कापसी अशी जोड ओळख सांगितली जाते. सुमारे ३१ वर्षांपूर्वी गलाटी नदीच्या कापसी वसलेले होते. गावाच्या पूर्व दिशेने वाहणाऱ्या या नदीच्या पुराचे पाणी गावात शिरुन नुकसान होऊ लागले. त्यामुळे १९९५ मध्ये नदीच्या पश्चिमेला एक किलोमीटरवर सुरक्षित स्थळी नियोजनबद्ध रस्ते, भूखंडाची आखणी करून गावाचे पुनर्वसन करण्यात आले. रस्ते काटकोनातील असून लोकसंख्या १२०० तर कुटुंब संख्या १५० पर्यंत आहे. जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे. भौगोलिक क्षेत्र सुमारे ४८२ हेक्टर, पैकी पेरणीलायक क्षेत्र ४५६ हेक्टर आहे. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा,ज्वारी अशी हंगामी पिके होतात. तरीही खरिपातील लाल मिरची हेच गावचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी मिरची उत्पादनात सातत्य ठेवले आहे. गंगाखेड व पालम तालुक्यांना पुरवठा करणारे लाल मिरचीचे आगर अशीही कापसीची ओळख आहे.
अशी आहे गावची लाल मिरचीची शेती
गावातील मिरची उत्पादक शिवाजीराव जाधव म्हणाले की मिरचीच्या देशी वाणाची गावातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून जोपासना केली आहे. दरवर्षी बियाणे विकत घेण्याची गरज भासत नाही. साधारण २५ जुलै नंतर ते ऑगस्ट महिन्यात श्रावण शुध्द पंचमीच्या दरम्यान पेरणी केली जाते. एकरी सुमारे अडीच ते तीन किलोनुसार बियाण्याचा वापर होतो. जानेवारीच्या दरम्यान तोडणी हंगाम सुरु होतो. हिरव्या मिरच्या झाडावर ठेवून लाल मिरच्यांचा तोडा केला जातो. शेतात किंवा घराच्या छतावर उन्हात आठवडाभर मिरची वाळवली जाते. त्यानंतर पोत्यामध्ये भरून ठेवली जाते.
महिला मजुरांना रोजगार
शेतकरी अल्पभूधारक असो किंवा बहुधारक गावातील किमान ७५ टक्के शेतकरी जमीनधारणा क्षेत्रानुसार कमी- अधिक क्षेत्रावर लाल मिरचीचे उत्पादन घेतात. अल्पभूधारक कुटुंबातील सदस्य लागवड, काढणी ते काढणी पश्चात वाळवणीची कामे स्वतः करतात. तोडणी हंगाम सुरु झाल्यानंतर या गावासह परिसरातील गावांमधील महिला मजूर तोडा करण्यासाठी गावात येतात. त्यांना १२ ते १६ किलो तोड्यामागे एक किलो मिरची ही मजुरी स्वरूपात देण्यात येते. रोख स्वरूपात ती दिवसाला ३०० रुपये असते.
अशी आहे कापसी येथील लाल मिरची
-मिरचीचा रंग कुंकवासारखा जर्द लाल रंग. साल पातळ.
-तिखटपणा जास्त. चव विशिष्ट.
-या वैशिष्ट्यांमुळेच बाजारात ही मिरची ग्राहकांचे लक्ष वेधून घेते.
-मिरची पावडर उद्योजकांकडूनही मोठी मागणी. नातेवाईक, मित्रमंडळींना लाल मिरचीचा वानवळा देण्यात येतो.
गावातच बाजारपेठ
पूर्वी गंगाखेड, पालम, राणीसावरगाव येथील आठवडी बाजारांमध्ये बैलगाडीतून मिरचीची पोते भरून विक्रीसाठी नेत असत. बाजारात येणारे ग्राहक शेतकऱ्यांकडून खरेदी करीत. अलीकडील वर्षात लाल मिरचीचे क्षेत्र व उत्पादन वाढले. त्यामुळे केवळ आठवडी बाजारापुरती विक्री मर्यादित राहिली नाही, मुंबई, पुणे तसेच अन्य ठिकाणचे व्यापारी गावात येऊन खरेदी करतात. परंतु त्यांच्याकडून तुलनेने कमी दर मिळतात. गावातील काही तरुण शेतकरी मुंबईला जाऊन मार्केटची माहिती घेऊन आले. तेव्हापासून अनेक शेतकरी थेट मुंबई मार्केटमध्ये मिरची विक्रीस नेत आहेत. यंदाच्या (२०२५-२६) हंगामात गावातून सुमारे १२०० क्विंटलपर्यंत विक्री झाली. यंदा सरासरी प्रति किलो २८० ते ३८० रुपये दर मिळाले. मुंबई पाठोपाठ आखाती देशांत मागणी आहे. त्यादृष्टीने निर्यातीचे नियोजन केले जात आहे. सहाय्यक कृषी अधिकारी विवेक ब्याळे यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य मिळते.
अल्पभूधारकांना मिरचीचा आधार
गावातील लताबाई आणि शिवाजीराव या जाधव दांपत्याची तीन एकर जमीन आहे. सिंचनासाठी विंधन विहिरीची सुविधा आहे. दरवर्षी एक एकराच्या दरम्यान त्यांचे मिरचीचे क्षेत्र असते. शिवाजीराव सांगतात की एकरी ८ ते ९ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतो. कोणत्याही परिस्थितीत सात क्विंटलपर्यंत तरी उत्पादन मिळतेच. सरासरी दर प्रति किलो ३५० रुपयांच्या दरम्यान मिळतो. काहीवेळा हे दर ४०० रुपयांपर्यंतही वर तर दोनशे रुपयांपर्यंत खाली घसरतात देखील. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण अनुभवातून एकरी अडीच लाखांच्या दरम्यान उत्पन्न ही मिरची मिळवून देते असे शिवाजीराव सांगतात. याच शेतीच्या बळावर त्यांना मुलीचे लग्न करता आले. पुण्याला जागा घेता आली.
योजनांचा लाभ
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत ५० शेतकऱ्यांचा गट स्थापन केला आहे. त्या माध्यमातून जैविक निविष्ठा तयार केल्या जातात. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत २०२५-२६ मध्ये कापसी गावात २५ शेतकऱ्यांना तुषार संच तर १० शेतकऱ्यांना ठिबक संचाचा लाभ देण्यात आला. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅ्क्टर, अवजारे, कडबा कुट्टी यंत्राचे लाभ देण्यात आले.
..........................................................
मिरची उत्पादकांचे अनुभव
गावातील संतोष जाधव म्हणाले की आमची ८० एकर जमीन आहे. अन्य शेतकऱ्यांची शेतीही करार पद्धतीने करतो. पोषक हवामान व काटेकोर व्यवस्थापनातून एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन आम्ही साध्य केले आहे. सन २०२५ मध्ये चार एकरांत लागवड केली होती. अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे एक एकर मिरचीचे नुकसान झाले. प्रतिकूल हवामानातही योग्य व्यवस्थापनातून मालाचा दर्जा चांगला टिकवला होता. किलोला सरासरी ३८० रुपयांच्या दरम्यान दर मिळाले. आजवर लाल मिरचीला कमीत कमी ७० रुपये दर (प्रति किलो) मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबईचे व्यापारी कापसीला आले होते. त्यांनी गावातील शेतकऱ्यांची मिरची खरेदी केली. वाहन चालक म्हणून गावातील मिरची घेऊन मुंबई येथील मार्केटला गेलो. तेथील व्यापाऱ्यांशी चर्चा केली. स्वतः विक्री केल्यास अधिक फायदा होत असल्याचे समजले. आता पाच वर्षापासून घरची तसेच गावातील शेतकऱ्यांकडील मिरची खरेदी करून मुंबई मार्केटमध्ये घेऊन जातो. त्यातून शेतकऱ्यांना थेट गावातच विक्रीची सुविधा मिळाली आहे.
..........................................
कोट
सुमारे ५० वर्षाहून अधिक वर्षापासून लाल मिरची हे गावचे पारंपारिक नगदी पीक आहे. पूर्वी गंगाखेड तालुक्यात कापसी आणि मसला ही गावे लाल मिरचीसाठी प्रसिद्ध होती. पालम तालुक्याच्या निर्मितीनंतर कापसीतील शेतकऱ्यांनी या मिरची उत्पादनात सातत्य ठेवले. त्यातून आर्थिक व कौटुंबिक प्रगती केली. पक्क्या घरांची बांधकामे केली.
विष्णू जाधव
संपर्क
शिवाजीराव जाधव- ८३२९०७०५०१
विष्णू जाधव- ९८२२१०१८३७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.