सासवड येथे कऱ्हा नदीवरील दशक्रिया घाटाजवळील पुलाचे काम संथ गतीने 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

कऱ्हा नदीवरील पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालकांना शहरातून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम रोडवेज सोल्यूशन या कंपनीकडे आहे.

गराडे - सासवड येथील दशक्रिया घाटाजवळील पुलाचे काम रखडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन सासवड शहरात कोंडी वाढत आहे. तसेच सासवड ते कापूरव्होळ या मार्गाचे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे संथ गतीने सुरू असून, या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यांबाबत शासकीय बांधकाम नियंत्रण कमिटीचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. 

कऱ्हा नदीवरील पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालकांना शहरातून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम रोडवेज सोल्यूशन या कंपनीकडे आहे. येथील जुना पूल पाडल्याने कंपनीने कोणत्याही पर्यायी मार्गाची व्यवस्था न केल्याने सासवड शहरामध्ये मात्र वाहतूक कोंडी वाढत आहे. पर्यायी मार्गाचे प्रथम डांबरीकरण करणे गरजेचे असताना देखील कोणत्याही प्रकारचे डांबरीकरण न केल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नारायणपूरहून येणारी वाहतूक सासवड येथील भैरवनाथ मंदिरापासून नेताजी चौक ते जेजुरी नाका अशी वळवली आहे. या मार्गावर असणारा संगमेश्वर मंदिर पूल 100 वर्षे जुना आहे. तो वाहतुकीस मध्यंतरी बंद केला होता. पण सद्या याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. तेव्हा शहरातील हा रस्ता खराब झाल्यामुळे त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. 

पूल तातडीने व्हावे - चौखंडे 
सासवड येथील जेजुरीनाका मार्गे दशक्रिया घाटा ते तहसील कचेरी येथील कऱ्हा नदीवरील पूल अतिवृष्टीत वाहून गेल्यामुळे तो पाडण्यात आला आहे. याठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे. पण हे ते संथ गतीने चालू असल्यामुळे संगमेश्वर पुलावरून सासवड शहरातून वाहतूक सुरू असल्यामुळे सासवड शहरातील रस्त्यावर विविध ठिकाणी वाहतुकीमुळे वाहनांची कोंडी होत आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तेव्हा हा पूल तातडीने व्हावा, अशी मागणी समता परिषदेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य व अखिल भारतीय माळी युवा मंचाचे पुणे जिल्हा अध्यक्ष भारत चौखंडे यांनी केली आहे. 

दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत

वीर फाटा ते कऱ्हा नदी पूल कचेरीपर्यंत जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग दिला होता. मात्र, जड वाहनांमुळे हा रस्ता पूर्णपणे खराब होऊन यावर मोठे खड्डे पडले आहेत. कंपनीने तातडीने हा रस्ता दुरुस्त केला पाहिजे. पण रोडवेज सोल्यूशन जबाबदारी घेणार का? 
- बाळासाहेब पायगुडे, स्वीकृत नगरसेवक 

सासवड ते कापूरव्होळ या रस्त्याचे काम गेली दोन वर्ष सुरू असून येत्या दोन महिन्यात सासवड जवळील तहसील कचेरी येथील पुलाचे काम पूर्ण होईल. 
- वैभव पाटील, व्यवस्थापक, रोडवेज सोल्यूशन कंपनी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karha river bridge work slow at Sasvad