

स्मार्ट मीटरविरोधात कऱ्हाडला जनआक्रोश माेर्चा
विविध संघटना, पक्षांचा सहभाग; वीज कंपनी, तहसीलमध्ये निवेदन
कऱ्हाड, ता. २२ ः स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत विविध सामाजिक, शेतकरी आणि राजकीय संघटनांनी आज वीज वितरण कार्यालय आणि तहसील कार्यालयावर येथे जनआक्रोश मोर्चा काढला. स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने थांबवावी, आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पारंपरिक मीटर पुन्हा बसवावेत, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्याची पद्धत बंद करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शहरातील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला. वीज वितरण कार्यालयासमोर शेतकरी व विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार व रवी बडेकर, अनिल घराळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत यादव, जान फाउंडेशनचे जावेद नायकवडी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आंदोलकांनी वीज वितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मोर्चेकरी पायी चालत प्रशासकीय कार्यालयात पोहोचले. तेथे अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी संग्राम पवार म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीपंपांची वीज तातडीने सुरू करावी, ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील.’’ श्री. लादे, प्रशांत यादव यांनी सक्तीने स्मार्ट मीटर न बसवण्याबाबतचा ठराव घेण्यात यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
W29116
कऱ्हाड ः स्मार्ट मीटरविरोधात विविध संघटना व पक्षांच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.