अखेर कर्जतच्या जंगलातील वृक्षतोड थांबली

अखेर कर्जतच्या जंगलातील वृक्षतोड थांबली
Published on: 

कर्जतच्या जंगलातील वृक्षतोड थांबली

स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमींसह राजकीय पक्षांचे पाठबळ

कर्जत (जि. रायगड) ता. २६ : टोरंट पॉवर कंपनीच्या कर्जत तालुक्यातील साई डोंगर-१ प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांच्या होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, जंगलातील वृक्षतोड थांबविण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून समोर आली आहे. मात्र, वृक्षतोड थांबली असली तरी प्रकल्पाविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
कर्जत तालुक्यात टोरंट पॉवर कंपनीचा तीन हजार मेगावॉट क्षमतेचा साई डोंगर-१ जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प होत असून, त्यासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. या प्रकल्पाविरोधात ॲड. कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापासून लढा सुरू आहे. तर, २० ऑक्टोबर रोजी जंगलात वृक्षतोड सुरू झाल्यानंतर स्थानिक ग्राम संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून या प्रकरणाची दखल घेतली गेली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष आणि विविध पर्यावरणवादी संघटना या मुद्द्यावर एकत्र येत असून, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनीही समाजमाध्यमांवरून वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी वृक्षतोड झालेल्या परिसराला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वृक्षतोडीविरोधात भूमिका सोशल मीडियावर मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची २८ ऑक्टोबर रोजी कर्जतमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे वृक्षतोड तात्पुरती थांबली असली, तरी जंगलाच्या संरक्षणासाठी सुरू झालेला संघर्ष आता राज्यव्यापी आंदोलनाचे स्वरूप घेण्याची चिन्हे आहेत.

साई डोंगर-१ प्रकल्पासाठी आवश्‍यक परवानग्या मिळाल्या आहेत. प्रकल्पस्थळी तसेच अन्य वनक्षेत्रात मिळून कंपनीकडून ९० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com