रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्र घडविला : संजय आवटे

रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्र
घडविला : संजय आवटे
Published on

बारामती, ता. २२ : ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था घडविली आणि रयत शिक्षण संस्थेने केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र घडविला,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संपादक संजय आवटे यांनी केले.
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती बारामतीतील विद्यालये व महाविद्यालयांच्या वतीने संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी आवटे बोलत होते. संयुक्त जयंती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे हे ५१ वे वर्ष आहे. येथील आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे तसेच लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी रांगोळी, चित्रकला व संस्कृत प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्मवीर वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना संजय आवटे यांच्या हस्ते फिरता चषक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
आवटे म्हणाले, ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प असताना बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या विचारातून अनेक गोरगरीब विद्यार्थी घडले. या संस्थेचा वटवृक्ष झाला असून, खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडविण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने केले आहे.’’
संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी कर्मवीरांचा शैक्षणिक वारसा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. संजय शेंडे यांनी नियोजन केले. प्राचार्य सतीश पाचपुते यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य गणपत तावरे यांनी आभार मानले. विकास जाधव व शुभदा खटके यांनी सूत्रसंचालन केले. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) व माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. अनेकान्तचे सचिव मिलिंद शहा (वाघोलीकर) यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com