

हिरेबागेवाडी (बेळगाव) ः येथे शेतकऱ्यांनी महामार्गावर केलेले आंदोलन.
ऊस उत्पादकांनी रोखला महामार्ग
राज्यासह कर्नाटकातील शेतकऱ्यांचा सहभाग; वाहतुकीचे तीन-तेरा
कागल (जि.कोल्हापूर), ता. १३ : केंद्राने साखरेचा किमान विक्रीभाव प्रतिकिलो ५० रुपये, सी-हेव्ही मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये आणि ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कर्नाटकातील विविध शेतकरी संघटनांनी आज महामार्गांवर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.
त्यात मोठ्या संख्येने ऊस उत्पादक सहभागी झाले आहेत. परिणामी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रोखल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सांगली आणि सातारा जिल्ह्यांतही अशाच प्रकारे आंदोलन झाल्याने आज महामार्ग आणि लगत पश्चिम महाराष्ट्र ते बेळगाव, हत्तरगीपर्यंतची वाहतूक ठप्प झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी, कर्नाटकातील शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी, प्रकाश नायक यांच्या नेतृत्वाखाली बेळगावागातील हिरेबागेवाडी टोलनाका, हत्तरगी टोल नाका येथेही महामार्ग रोखून धरण्यात आला.
छतावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
आंदोलनादरम्यान हत्तरगी येथे युवा शेतकरी लक्ष्मीकांत याने टोल नाक्याच्या छतावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी एका शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून त्याला रोखल्याने अनर्थ टळला. कोगनोळी टोलनाका येथील आंदोलनादरम्यान राजू शेट्टी म्हणाले, ‘‘गेल्या सात वर्षांपासून केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्रीभाव वाढवलेला नाही. सध्या साखरेला प्रतिकिलो ५५ ते ६० रुपये दर मिळत असताना किमान विक्रीभाव ५० रुपये निश्चित केल्यास बाजारातील दर स्थिर राहण्यास मदत होईल. यंदा देशात गरजेइतके साखर उत्पादन होण्याची शक्यता नसल्याने हा निर्णय घेणे आवश्यक आहे. सध्या इथेनॉलला प्रतिलिटर ५७ रुपये ७५ पैसे दर मिळतो. पेट्रोलच्या वाढलेल्या दराचा लाभ ऊस उत्पादकांनाही मिळावा, यासाठी इथेनॉलचा दर ७० रुपये करावा. या निर्णयामुळे सरकारवर आर्थिक बोजाही पडणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत साखर कारखाने सुरू करू नयेत.’’
वळसे-पाटलांना शेट्टींचा खडा सवाल
पाच हजार रुपये प्रतिटन ऊसबिल देण्याच्या मागणीवरून माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना राजू शेट्टी यांनी सवाल केला की, पाच हजार रुपये आमच्या काकांनी ठेवले आहेत का? शेतकऱ्यांचा ऊस काय तुमची पेंड आहे का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. महामार्ग बंदच ठेवला जाईल, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.