शेतकऱ्यांनो, भात पिकावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी 'या' उपाययोजना करा...

गोरख माझिरे
Sunday, 13 September 2020

मुळशी तालुक्‍यात भात पिकावर करपा; कृषी विभागाकडून औषध फवारणीबाबत पाहणी करून मार्गदर्शन 

कोळवण (पुणे) : दिवसभर कडक ऊन व सायंकाळी जोरदार पाऊस यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मुळशी तालुक्‍यात अनेक ठिकाणी भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भातपीक हातातून निसटून जाणार नाही ना, याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. कृषी विभागाने याची दखल घेतली असून रोगाची पाहणी करून शेतकऱ्यांना रोग नियंत्रणाबाबत बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळशी तालुक्‍यात साधारण 7600 हेक्‍टर जमिनीमध्ये भातशेती केली जाते. शेतकरी आधुनिक चारसूत्री पद्धतीने लागवड करतात व पिकास युरिया ब्रिकेट गोळी खत देतात. त्यामुळे पीक जोमात होते. मात्र, यावर्षी लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यानंतर निसर्ग वादळामुळे जोरदार पाऊस झाल्याने बीज उगवलेच नाही. पुन्हा पेरणी केल्यानंतर पावसाने ओढ दिली. पावसाला सुरुवात झाल्यानंतर कसेबसे शेतकऱ्यांनी भात पिकाची लागवड केली. परंतु, आता भात पिकावर कीटकांचा आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोळवण खोऱ्यात व रिहे खोऱ्यात नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ योगेश यादव यांच्यासह पिरंगुटचे मंडल कृषी अधिकारी नामदेव झंजे, पौडचे मंडळ कृषी अधिकारी अर्जुन जाधव, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र होले, दत्तात्रेय कनकधर, कृषी सहायक विकास भोर, शेखर विरणक, विश्वनाथ काळभोर, सुदाम पारखी, प्रियांका चौधरी यांनी शेतकऱ्यांना औषध फवारणी बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी नारायण दहिभाते, सोपान दाभाडे, बबन दाभाडे, नाना दहिभाते, ज्ञानेश्वर मांडेकर, ज्ञानोबा साठे, कृष्णा फाले, लक्ष्मीबाई फाले, काशिनाथ टेमघरे, जनाबाई मराठे आदी शेतकरी संख्येने उपस्थित होते. 

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

बुरशीनाशकाची फवारणी... 
करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 1250 ग्रॅम किंवा डायथेन एम-42 1250 ग्रॅम किंवा कार्बेन्डेनझिम 500 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या रोगाच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karpa on rice crop in Mulshi taluka