esakal | पुण्यात शिकणाऱ्या काश्‍मिरी विद्यार्थ्यांना कुटुंबीयांची वाटतेय काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे - जम्मू- काश्‍मीरमध्ये संपर्क यंत्रणा बंद असल्याने कुटुंबीयांशी संवाद होत नसल्याची व्यथा मांडताना काश्‍मिरी विद्यार्थी.

जम्मू- काश्‍मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर संपर्काची साधने बंद आहेत. एकमेकांशी संवाद बंद झाल्यामुळे पुण्यात शिक्षण घेणाऱ्या तरुणांचे त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणेही होत नाही. केंद्र सरकारने आता तरी तेथील संपर्क व्यवस्था खुली करावी, ज्यामुळे घरचे लोक सुरक्षित आहेत का, हे आम्हाला समजेल, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुण्यात शिकणाऱ्या काश्‍मिरी विद्यार्थ्यांना कुटुंबीयांची वाटतेय काळजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जम्मू- काश्‍मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर संपर्काची साधने बंद आहेत. एकमेकांशी संवाद बंद झाल्यामुळे पुण्यात शिक्षण घेणाऱ्या तरुणांचे त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणेही होत नाही. केंद्र सरकारने आता तरी तेथील संपर्क व्यवस्था खुली करावी, ज्यामुळे घरचे लोक सुरक्षित आहेत का, हे आम्हाला समजेल, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.  

जम्मू- काश्‍मीरच्या विविध भागांतील विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. यातील कात्रज येथील सरहद संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, काश्‍मीरमध्ये संपर्क यंत्रणा बंद असल्याने कुटुंबीयांची काळजी वाटत आहे,  अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ना आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो, ना ते आम्हाला फोन करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. 

अदिल मलिक हा बारामुल्ला जिल्ह्यातील आहे. तो म्हणाला, ‘‘अचानक घटना घडत गेल्याने लोक धास्तावलेले आहे. लोकांना फिरण्याचे स्वातंत्र्य द्या. संपर्क यंत्रणा ठप्प आहेत. मी दोन दिवसांपूर्वी येथे आलो. आता घरच्यांना फोन करू शकत नाही. मी पोचलो आहे, हेदेखील त्यांना माहीत नाही.’’ जाहीद भट म्हणाला, ‘‘पाच ऑगस्टला मी पुण्याला यायला निघालो. त्या दिवशी रस्त्यात अनेक चेकपोस्टवर तपासणी झाली. तेव्हापासून काश्‍मीरची योग्य माहिती मिळत नाहीये.’’

मूळचा बडगाम येथील फिरदौस मीर पुण्यात बीएच्या तिसऱ्या वर्षाला आहे. तो म्हणतो, ‘‘आज वीस दिवस झाले, घरच्यांशी बोललो नाही. घराच्या आजूबाजूला प्रचंड सुरक्षा आहे. मित्र परिवार एकमेकांच्या घरी जाऊ शकत नाही. अनुचित काही घडेल म्हणून लोक धास्तावले आहेत.’’

पाच ऑगस्टपासून घरच्यांबरोबर संपर्क नाही. तिथे सैन्य येत असल्याने घरच्यांनी घाबरून मला परत बोलावले होते. सरकारने संपर्क यंत्रणा खुली केली पाहिजे, ज्यामुळे त्यांच्याशी बोलता येईल.
- नझीर

आता फक्त काय होणार याचाच विचार आम्ही सर्वजण करतो आहोत. एकमेकांना दिलासा व आधार देत आम्ही येथे राहात आहोत. येथील मित्रही मदत करत आहेत.
- मुश्‍ताक अहमद

loading image
go to top