esakal | Katraj : रुतलेल्या चाकांना गणेशोत्सवामुळे दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

travels business

Katraj : रुतलेल्या चाकांना गणेशोत्सवामुळे दिलासा

sakal_logo
By
अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : कोरोनामुळे मोठ्या अडचणीत सापडलेला ट्रॅव्हल्स व्यवसाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उभारी घेताना दिसत आहे. परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नसली, तरी गतवर्षीपेक्षा चांगली असल्याचे बसमालक सांगतात. कोरोनाकाळात या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर ट्रॅव्हल्स व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले होते. मात्र, त्यांना आता काही प्रमाणात बाप्पा पावला असल्याचे चित्र आहे. गतवर्षीपेक्षा यंदा बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कोरोनाचे सावट निवळले नसले, तरी गाळात रुतलेला खासगी बस व्यवसायास काही प्रमाणात तेजी आली आहे.

गौरी गणपती या सणांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून राज्यातल्या विविध भागात जाणाऱ्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याकरिता खासगी बसकडून दरवर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी होती. त्यामुळे या व्यवसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. मात्र, यंदा काही प्रमाणात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाला २ ते ३ दिवसांचा अवधी असतानाही गाड्या भरल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ऑनलाइन बुकिंगला प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात जाऊन बुकिंग करण्यापेक्षा प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंग करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. ट्रॅव्हल्स व्यावसायिकही डिजिटल झाले असून त्यांच्या स्वतंत्र संकेतस्थळांबरोबरच अॅपही आहेत. तसेच स्वतंत्र बुकिंगसाठीची संकेतस्थळेही आहेत. प्रवासीही घरबसल्या बुकिंग करण्याला प्राधान्य देत आहेत.

दरवर्षी गणेशोत्सवात गाड्यांना मोठा प्रतिसाद असतो. मात्र, कोरोनानंतर तसा प्रतिसाद कधीच पाहायला मिळालेला नाही. परंतु, यंदा गतवर्षीपेक्षा चांगला प्रतिसाद असल्याने फायदा होईल.

- योगेश वाघ, व्यवस्थापक, राजेंद्र ट्रॅव्हल्स

या मार्गांवर जादा बस

पुण्यातून विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक आणि कोकणातील रत्नागिरी, दापोली, चिपळूण आदी मार्गांवर मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात येत आहेत.

loading image
go to top