
कात्रज - जुन्या कात्रज घाटातील बोगद्याच्या सुरक्षिततेलाच प्रशासनाकडून कात्रजचा घाट दाखविण्यात येत आहे. हा बोगदा ब्रिटीशकालीन असून जवळपास दीडशे वर्षे झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता या बोगद्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची व्यवस्थितरित्या डागडुजी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
जानेवारी महिन्यात बोगद्याच्या काही भागाची पडझड झाली होती. त्याची अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्ती करण्यात आलेली नाही. घाट रस्त्याचा वापर दररोज हजारो वाहने करतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोगद्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत नसल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मागील पावसाळ्यात बोगद्यात मोठ्या प्रमाणात गळती होत होती. एकीकडे नवीन कात्रज बोगद्यात लाईट तर जुन्या बोगद्यात अंधार अशी परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घाट रस्त्यात अनेक ठिकाणी डोंगरावरील दगड कोसळण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी घाट आणि बोगद्यातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा याचा धोका बोगद्याच्या कामाला होऊ शकतो.
अवजड वाहनांमुळे अधिक धोका
बोगद्यातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होते. ही वाहने आकाराने मोठी असल्याने भिंतीला घासतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्याप्रमाणे हा बोगदा ऐतिहासिक असून ब्रिटीशकालीन आहे. सध्यातरी त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मात्र, अवजड वाहतूकीच्या धक्क्यांमुळे अडचणी निर्माण होतात. एकाचवेळी मोठी दोन वाहने आल्यास भिंतीला घासून बोगद्याचा काही भाग कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
बोगद्याचा संपूर्ण सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन यांच्यामार्फत निधीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडेही तरतूद उपलब्ध होण्यासाठी मागणी करण्यात येणार असून त्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यंदाच्या राज्यस्तरीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार योग्य ती कामे हाती घेऊन डागडुजी करण्यात येणार आहे.
- देवेन मोरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
हा बोगदा इंग्रजकालीन आहे. मात्र, बोगद्याची देखभालदुरुस्ती करण्यात येत नाही. त्यावेळी बांधल्यापासून आहे तसाच आहे. प्रशासनाचे याकडे काटेकोरपणे लक्ष असायला हवे. बोगद्यात आता सातत्याने काहीतरी पडझड झाल्याचे आपण पाहत असतो. यासाठी योग्य काळजी घेत त्याची डागडुजी करण्यात यावी. तसेच, स्ट्रक्चरल ऑडिट करुन उपायोजना करण्याची गरज आहे.
- अभिजित सोनवणे, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.