हप्तेखोर तोतया पत्रकाराचा धुमाकूळ

हप्तेखोर तोतया पत्रकाराचा धुमाकूळ
Published on

केडगाव, ता. ११ : राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची हवा आहे. या परिस्थितीचा फायदा घेत तुम्ही अन्न भेसळ करता, जळणाला प्लास्टिक वापरता, तुमच्यावर कारवाई होईल. बातमी दिली तर तुम्हाला फार महागात पडेल, जेलची हवा खावी लागेल अशी भीती दाखवत केडगाव-दापोडी परिसरात एक तोतया पत्रकार परप्रांतीय गुऱ्हाळचालकांकडून हप्ते गोळा करत आहे.
या तोतया पत्रकाराच्या धमक्यांना गुऱ्हाळचालक अक्षरश: वैतागले आहेत. गुऱ्हाळावर कारवाई होईल, पोलिसांना दूरध्वनी करतो, प्रदूषण विभागाला माहिती देतो, बातमी छापतो, अशी भीती दाखवत केडगाव-दापोडी परिसरातील गुऱ्हाळचालकांकडून एका कथित तोतया पत्रकाराकडून हप्ते मागितले जात असल्याचा गंभीर आरोप गुऱ्हाळचालकांनी केला आहे. सुरुवातीला महिन्याला मागितला जाणारा हप्ता पंधरा दिवसांवर आणि त्यानंतर थेट आठवड्यावर आल्याने या ‘हप्ता वसुली’ला वैतागलेल्या गुऱ्हाळचालकांनी अखेर संबंधित व्यक्तीला जाब विचारत धारेवर धरल्याची घटना नुकतीच घडल्याचे सांगण्यात आले. या संदर्भातील एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. दरम्यान, गुऱ्हाळामध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्यास पोलिस, महसूल प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण विभागांनी नियमानुसार तपासणी करून कारवाई करणे अपेक्षित आहे, असे मत व्यक्त होत आहे.

अखेर संयम सुटला
वारंवार होणारी पैशांची मागणी आणि कारवाईची भीती यामुळे गुऱ्हाळचालकांमध्ये संताप वाढत गेला. नुकतेच संबंधित तोतया पत्रकार एका गुऱ्हाळावर गेल्यानंतर काही गुऱ्हाळचालकांनी त्याला जाब विचारला. अनेक गुऱ्हाळचालकांनी एकत्र येत त्याला धारेवर धरल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने तेथून काढता पाय घेतल्याची माहिती गुऱ्हाळचालकांनी दिली आहे.


अशा प्रकारे कोणी दमदाटी करून, कारवाईची भीती दाखवत पैसे मागत असेल तर संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार करावी. दोषींवर कारवाई केली जाईल.
- संतोष तासगावकर, पोलिस निरीक्षक, यवत

Marathi News Esakal
www.esakal.com