esakal | केडगाव : वादग्रस्त कोविड सेंटरची मान्यता अखेर रद्द!
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

केडगाव : वादग्रस्त कोविड सेंटरची मान्यता अखेर रद्द!

sakal_logo
By
रमेश वत्रे

केडगाव : केडगाव येथील वादग्रस्त मोहन जनरल हॅास्पिटलमधील कोविड सेंटरची (डिसीएससी) मान्यता रद्द करण्यात आली असून रूग्णांकडून जास्तीची घेतलेली १२ लाख ५८ रूपयांची बिले रूग्णांना परत करावीत असा आदेश प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिला आहे. याशिवाय २९ एप्रिलला एकाच दिवशी या रूग्णालयात चार जणांचा झालेला मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झालेला नसल्याचे निरीक्षण तपासणी पथकाने नोंदवले आहे. (Kedgaon Recognition of controversial covid Center finally canceled)

हेही वाचा: दौंड : उंडवडी-सौंदडवाडी परिसरात बिबट्याची दहशत!

प्रांताधिकारी गायकवाड यांना सादर केलेल्या अहवालात पथकाने अनेक त्रुटींचे निरीक्षण नोंदवले आहे. अहवालात म्हटले की, "मोहन हॅास्पिटलच्या बिलांबाबत तक्रारी आहेत. लेखापरिक्षणासाठी बिले न दिल्याने डॉ. मोहन यांना दोनदा नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यांनी खुलासा केला नाही. चार जणांचा मृत्यू झाला तेव्हा रूग्णालयात ऑक्सिजन शिल्लक होता. रूग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण दाखल करून घेत उपचाराबाबत हलगर्जीपणा दिसून आला आहे. रूग्णालयात रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात आली परंतू त्याचा आयसीएमआर कोड जनरेट झालेला नाही.

हेही वाचा: जुन्नर : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाचा तालुक्यातील सरपंचांकडून निषेध

रूग्ण योगेश गायकवाड यांच्या बिलांची रक्कम ८७ हजार आहे. परंतू रूग्णालयाने स्टार हेल्थ कंपनीकडून दोन लाख ७८ हजार रूपयांचे बील वसूल केले आहे. याशिवाय डिपॅाझिट म्हणून घेतलेले ६० हजार रूपये परत दिलेले नाहीत. रूग्णालयात कुठलेही दरपत्रक लावलेले नाही. अतिदक्षता विभागात दोन खाटांमध्ये दोन फुटाचे अंतर आहे. रूग्णांच्या दैनंदिन नोंदी नाहीत. रूग्णांच्या निदानाच्या नोंदी नाहीत. जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावलेली नाही. ऑक्सिजन ऑडिट प्रमाणपत्र नाही. या त्रुटींच्या आधारे पथकाने रूग्णालय सील करण्यात यावे असे मत नोंदवले आहे.

या कोविड सेंटरमधील सर्व रूग्ण बरे होऊन घेरी गेल्यानंतर तेथील साहित्य अधिग्रहीत करून इतर कोविड सेंटरला देण्यात यावे व हॅास्पिटलवर बॅाम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवावा, असा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदार संजय पाटील यांना दिला आहे.

१२ लाखांचा आकडा बोगस - वैशाली ताम्हाणे

मृताच्या नातेवाईक वैशाली ताम्हाणे म्हणाल्या, ''पथकाने एका महिन्यातील ५९ रूग्णांच्या बिलांची तपासणी केली व त्या सगळ्यांकडून १२ लाख रूपये जादा घेतल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. ५९ रूग्ण व १२ लाख हे दोन्ही आकडे बोगस आहेत. 'त्या' चार रूग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसतील तर ते कशामुळे झाले हे नातेवाईकांना समजले पाहिजे. चौकशी संशयास्पद वाटत आहे. याबाबत मी जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार आहे.''