चाहत्यांना डोळ्यासमोर ठेवूनच भूमिका 

महेश बर्दापूरकर- सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - ""माझा "रईस' हा चित्रपट स्मगलरच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मात्र माझे टीन एजर्स चाहते, महिलांना अवघडल्यासारखं होईल, असं काहीच मी चित्रपटात करीत नाही. त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच मी भूमिका निवडतो. हा गुन्हेगारीपट असला तरीही सर्व कुटुंबानं एकत्र पाहण्यासारखा आहे. हेच त्याचं वैशिष्ट्य ठरलं आहे,'' हिंदी चित्रपटसृष्टीचा बादशहा शाहरुख खान खास "सकाळ'शी बोलत होता "रईस'च्या प्रमोशनसाठी तो पुण्यात आला होता. 

स्मगलरच्या आयुष्यावरचा चित्रपट असूनही त्यात भाषा आणि प्रसंग खूपच मवाळ आहेत, ही गोष्ट जाणून-बजून करण्यात आली आहे का, या प्रश्‍नावर बोलताना शाहरुख म्हणाला, ""दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी कथा व संवाद लिहिताना अशा गोष्टी टाळल्याच होत्या. मलाही माझ्या चित्रपटात घाणेरडी भाषा नको वाटते. राहुलसह चित्रपटाशी संबंधित बहुतांश लोक पत्रकारितेशी संबंधित असल्यानं चित्रपटाची भाषा काव्यात्मक आणि मवाळ आहे. त्यामुळंच सर्व स्तरांतील प्रेक्षक चित्रपट पाहात आहेत.'' स्वतःच्या चाहत्या वर्गाबद्दल माहीत असताना "फॅन', "लव्ह यू जिंदगी' किंवा "रईस'सारख्या वेगळ्या चित्रपटांमध्ये काम करण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल तो म्हणाला, ""इंडस्ट्रीमध्ये 25 वर्षे घालवल्यानंतर मला स्वतःला आव्हान देणाऱ्या, समाधान देणाऱ्या भूमिका करून पाहायच्या आहेत. वयाच्या 51व्या वर्षी चाहत्यांना नक्की कसं समाधान द्यायचं, याबद्दल माझा कधी गोंधळही उडतो. त्यांना हवं तेच करीत राहिल्यास मी कधीच समाधानी होणार नाही. त्यामुळं मी असे प्रयोग करीत राहतो. मात्र, इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात मी पुन्हा एकदा माझ्या चाहत्यांना आवडणाऱ्या प्रेमिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.'' 

"फॅन' माझा आवडता चित्रपट 
""मी आजपर्यंत केलेल्या 70 चित्रपटांतील "फॅन' हा माझा सर्वाधिक आवडता चित्रपट आहे. त्यामध्ये वापरलेलं तंत्रज्ञानही खूपच उच्च दर्जाचं होतं आणि आम्ही सर्वांनी खूपच जीव ओतून काम केलं होतं. तो चित्रपट प्रेक्षकांना का आवडला नाही, हे माझ्या दृष्टीनं कोडंच आहे,'' असं उत्तर त्यानं आपल्या कारकिर्दीतील सर्वांत आवडत्या भूमिकेबद्दल बोलताना दिलं.

Web Title: Keeping in mind the role of fans