सलग ३० तास ४५ हजार क्‍युसेकने विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 August 2019

अफवांवर विश्वास ठेवू नका 
बंडगार्डन बंधाऱ्याला तडे गेले, खडकवासला धरण फुटण्याच्या मार्गावर यांसारख्या अफवा सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. खडकवासला धरणासह जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित आहेत, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले.

खडकवासला धरणातून दोन दिवसांत पाच टीएमसी पाणी मुठा नदीत
खडकवासला - खडकवासला धरणातून रविवारी संध्याकाळी पाच वाजता ४५ हजार ४७४ क्‍युसेकने विसर्ग सुरू झाल्यानंतर तो सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत सलग ३० तास कायम होता.

सलग ३० तास विसर्ग कायम ठेवल्याने धरणातून पाच टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. सोमवारी दिवसभरात खडकवासला येथे २२, पानशेत ३९, वरसगाव येथे ५३ व टेमघर येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासलाबरोबरच पानशेतमधून नऊ हजार ८९२, वरसगावमधून आठ हजार ५३५ व टेमघर धरणातून सहाशे क्‍युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. हा विसर्ग खडकवासला धरणात जमा होत आहे. चारही धरणात मिळून २९.०८ टीएमसी म्हणजे ९९.७७ पाणीसाठा जमा झालेला आहे. मागील वर्षीपेक्षा हा साठा चार टीएमसीपेक्षा जास्त आहे.

‘कोळवण’चा संपर्क तुटलेलाच
पौड - मुळशी तालुक्‍यात पुराचे थैमान दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. ४८ तास उलटले तरी कोळवण खोऱ्याचा तालुक्‍याशी संपर्क तुटलेला आहे. कोंढवळे- शिर्केवाडा येथे राष्ट्रीय महामार्गावर गुडघाभर पाणी असल्याने मुळशी धरण तसेच कोकणाकडे 
जाणारी वाहतूक बंद आहे. जनजीवन गेल्या दोन दिवसांपासून विस्कळित झाले आहे.

वळवण धरणातून विसर्ग
लोणावळा - लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटांचे वळवण धरण ९१ टक्के भरले असून, धरणाच्या दोन सांडव्यातून ५० क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. लोणावळ्यात सोमवारी २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी लोणावळा धरणातून डक्‍ट लाइनमार्गे वीजनिर्मितीसाठी साडेचारशे क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. 

जनावरांची सुटका
पवनानगर - कोथुर्णे येथे पुरात अडकलेल्या पंधरा जनावरांची सुटका करण्यात शिवदुर्गच्या पथकाला सोमवारी यश आले. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने नदीला पूर आला आहे. कोथुर्णे येथील राम नढे यांचा म्हशींचा गोठा आहे. रविवारी (ता. ५) नदीचे पाणी गोठ्यात शिरल्याने तीस जनावरे अडकून पडली होती. अथक परिश्रमातून १५ जनावरे बाहेर काढण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasala Dam Water Release Rain