खडकवासला प्रकल्पात ४.८० टीएमसी साठा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल. उर्वरित १.०५ टीएमसी पाणी पालख्या व आकस्मिक तरतूद म्हणून ठेवल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव
खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल. उर्वरित १.०५ टीएमसी पाणी पालख्या व आकस्मिक तरतूद म्हणून ठेवल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

दौंड, इंदापूर, हवेली व बारामती तालुक्‍यातील शेतीसाठी उन्हाळी आवर्तन १२ एप्रिलपासून सुरू केले होते. हे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केले. या आवर्तनामध्ये २८ दिवसांत सुमारे तीन टीएमसी पाणी दिले, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.

कालव्यातून सोडलेल्या तीन टीएमसी पाण्यापैकी २.६८ टीएमसी पाणी शेतीसाठी होते; तर उर्वरित ०.३२ टीएमसी पाणी दौंड, बारामती परिसरातील ३५ गावांसाठी टंचाई आरक्षण म्हणून दिले. यात वरवंड येथील पाझर तलाव भरून ठेवला. हे पाणी बारामती तालुक्‍यातील सुपे आणि परिसरातील गावांना दिले.

दरम्यान, खडकवासला धरणात ४.८० टीएमसी पाणीसाठा उरला आहे. महापालिका दरमहा सुमारे दीड टीएमसी पाणी वापरते. तसेच, अन्य पाणी योजनांनादेखील पाणी धरणातून दिले जाते. 

या गोष्टी गृहीत धरून ३१ जुलैअखेर सुमारे ३.७५ टीएमसी पाणी गृहीत धरले आहे. उर्वरित पाणी पालख्यांसाठी राखीव ठेवले आहे. जूनमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून पुढे जातात. 
शहर, हडपसर, फुरसुंगीपासून पाटसपर्यंत वारकऱ्यांना कालव्यातून पाणी दिले जाते, असे शेलार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasala Dam Water Storage