Pune : खडकवासला ते पानशेत जागोजागी कचऱ्याचे ढीग; रात्र होताच हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्ट चालकांचा कचरा येतोय रस्त्यावर

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस वाढ
pune waste
pune wastesakal

सिंहगड: खडकवासला गावापासून थेट पानशेत पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत असून परिसरातील हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्ट यांमधून हा कचरा पोत्यांमध्ये भरुन रात्रीच्या वेळी आणून टाकला जात आहे.

प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस पुणे-पानशेत रस्ता या कचऱ्यामुळे अधिकाधिक बकाल होत चालला आहे. धक्कादायक म्हणजे पाऊस आल्यानंतर हा कचरा थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळून पाणी दुषित होत आहे.

पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, घेरासिंहगड, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मालखेड, वरदाडे, निगडे, ओसाडे, सोनापूर, रुळे, आंबी, कुरण व पानशेतसह आजूबाजूच्या इतर गावांच्या हद्दीत अनेक हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्ट आहेत.

लाखो पर्यटक या भागात येत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निर्माण होतो. या भागातील ग्रामपंचायतींनी कचरा व्यवस्थापन केलेले नसल्याने बहुतांश व्यावसायिक हे दररोज रात्री कचऱ्याची पोती भरुन जागा मिळेल तेथे आणून टाकत आहेत.

परिणामी सर्व गावांच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग पडलेले दिसत आहेत. प्रशासनाकडून कचरा फेकणाऱ्या या व्यावसायिकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस निसर्गसंपन्न असलेला पुणे-पानशेत रस्ता बकाल होत चालला आहे. खडकवासला धरणाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एनडीए-बहुली रस्त्याच्या कडेनेही हेच चित्र दिसून येत आहे.

कचरा जातोय थेट खडकवासला धरणात

पुणे-पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. धरणाच्या बाजूला उतार असल्याने पाऊस आल्यानंतर सर्व सडलेला कचरा, घाण थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळून पाणी दुषित होत आहे.

खडकवासला धरणाच्या पाण्यात कचरा, सांडपाणी मिसळून होत असलेल्या प्रदुषणाबाबत सकाळ'ने सातत्याने शासन, प्रशासनाचे लक्ष वेधलेले आहे मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणत्याही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.

pune waste
Pune Accident : पुण्यातल्या भूमकर पुलावर अपघात; ट्रकने कारला दीड किलोमीटर फरफटत नेलं

कचऱ्याच्या ढिगांवर मोकाट कुत्र्यांच्या झुंडी कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरकटे मांसाहारी पदार्थ असल्याने जागोजागी या कचऱ्याच्या ढिगांवर मोकाट कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. रात्रीच्या वेळी ही कुत्री रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांना असुरक्षित वाटत असून अपघातही होत आहेत.

संबंधित सर्व विभागांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. "कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. कचऱ्यामुळे येणारा-जाणारांना तर त्रास होतच आहे परंतु ज्या खडकवासला धरणाचे पाणी आपण सर्वजण पित आहोत ते मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे.प्रशासनाने परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अगोदर उपाययोजना करणे आवश्यक आहे."

- नवनाथ पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य, डोणजे.

"दिवाळीपूर्वी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व गावांच्या सरपंचांची बैठक घेऊन सूचना देण्यात आलेल्या आहेत. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार पीएमआरडीए च्या माध्यमातून सांडपाणी व कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

संबंधित ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्व हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्ट व इतर आस्थापनांना लेखी नोटीस देऊन आपापल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. संबंधितांनी आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे."

-रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी,पुणे जिल्हा परिषद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com