खेड शिवापूर टोल नाक्‍यावरील परिस्थिती; सवलतीसाठी स्वतंत्र मार्गिकेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

खेड शिवापूर टोल नाक्‍यावर फास्टॅगद्वारे टोलवसुली बंधनकारक करण्यात आली असली तरी स्थानिकांना टोलमधून सवलत मिळावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

खेड शिवापूर - फास्टॅगधारक आणि फास्टॅग नसलेल्या वाहनांचे वर्गीकरण करण्यात येणाऱ्या अडचणीमुळे खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणा विस्कळित होत आहे. त्यासाठी फास्टॅगधारक वाहनांची संख्या वाढणे गरजेचे असल्याचे टोल प्रशासनाचे म्हणणे आहे. दुसरीकडे स्थानिकांना सवलत मिळावी, यासाठी टोल नाक्‍यावर स्थानिकांच्या वाहनांसाठी फास्टॅग स्कॅनर नसलेली स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खेड शिवापूर टोल नाक्‍यावर फास्टॅगद्वारे टोलवसुली बंधनकारक करण्यात आली असली तरी स्थानिकांना टोलमधून सवलत मिळावी, असे त्यांचे म्हणणे आहे. वाहनांना फास्टॅग लावण्यात आल्याने खात्यातून रक्कम वजा होते. त्यामुळे स्थानिक म्हणून आम्हाला सवलत मिळत नाही. त्यामुळे खेड शिवापूर टोल नाक्‍यावर स्थानिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात यावी, असे ॲड. नितीन गोगावले, दादा पवार यांनी मागणी केली. खेड शिवापूर टोल नाक्‍यावर फास्टॅग स्कॅन न होणे, स्कॅन झाले तरी रोख पैसे घेणे, असे प्रकार होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

‘‘दोन दिवसांपूर्वी खेड शिवापूर टोल नाक्‍यावर माझ्या वाहनाच्या फास्टॅगमधून टोलची रक्कम वजा झाल्याचा संदेश आला. तरीही टोलवसुली झाली नसल्याचे सांगून माझ्याकडून रोख टोल घेतला. शिवाय त्या टोल पावतीवर चुकीचा वाहन क्रमांक टाकण्यात आला. याविषयी विचारणा केली असता, टोलवरील संबंधित महिला  कर्मचाऱ्याने उद्धट उत्तरे दिली. याबाबत टोल पावतीवरील टोल प्रशासनाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होत नाही,’’ असा अनुभव प्रवासी अशोक देशमुख यांनी सांगितला. 

फास्टॅग असूनही खेड शिवापूर टोल नाक्‍यावर जास्त वेळ रांगेत थांबावे लागते. या ठिकाणी फास्टॅग यंत्रणा योग्य प्रकारे राबवली जात नसल्याचे प्रवासी विवेक भोसले यांनी सांगितले. फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित झाल्यापासून मार्गिकेतून दर तासाला जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचे पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले. पूर्वी रोख मार्गिकेतून एका तासाला बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे २४० होती. ती संख्या फास्टॅग सुरू झाल्यापासून ६५० वर गेली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिकांसाठी महिन्याचा टोल पास उपलब्ध आहे. या पासच्या रकमेचे त्यांनी आपल्या वाहनांच्या फास्टॅगमध्ये रिचार्ज करावे. 
- अमित भाटिया,  व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khed Shivapur toll naka situation