
किरकटवाडी: 'कार्ड' नाही त्याला दाखवला जातो कायदा
किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा, किरकटवाडी व नांदोशी परिसरात पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांकडून पाच अवजड डंपरवर कारवाई करण्यात आली व दोन लाख पंचवीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ओव्हरलोडींगच्या नियमानुसार सदर डंपरवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. मागेही काही दिवसांपूर्वी या भागात सुस्थितीत नसलेल्या डंपरवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली होती.
नांदोशी-सणसनगर या गावच्या हद्दीत मोठ्या दगडखाणी आहेत. येथील दगड खाणीतून खडी, क्रशसॅंड, डबर अशा मालाची वाहतूक होत असते. यासाठी दिवसभरात शेकडो अवजड डंपर सिंहगड रस्त्यावरुन ये-जा करत असतात. प्रादेशिक परिवहन विभागाचे पथक महिन्यातील काही दिवस या भागात फिरत असते व त्यांच्याकडून 'काही' वाहनांवर कारवाई करण्यात येते.
शेकडो डंपर ये-जा करत असताना केवळ चार ते पाचच डंपरवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) पथकाकडून कारवाई का करण्यात येत असेल? या प्रश्नाचे उत्तर 'कार्ड' आहे. ज्या डंपरचे कार्ड काढलेले असते असा डंपर आरटीओ पथकाच्या समोरुन बिनदिक्कत ये-जा करु शकतो, मात्र ज्यांचे 'कार्ड' काढलेले नाही असे डंपर अगदी शोधून-शोधून त्यांच्यावर विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येते व मोठा दंड वसूल केला जातो.
काय आहे 'कार्ड' पद्धत?...
आरटीओ चे 'कार्ड' हे काही आधार कार्ड,पॅन कार्ड किंवा एटीएम कार्ड सारखे नसते की जे डोळ्यांना दिसेल. प्रत्येक डंपरचा महिन्याचा 'दर' ठरलेला असतो. त्यालाच 'कार्ड' म्हणतात. जिल्हाभर या 'दरपत्रकाप्रमाणे' वसुली केली जाते. कोण 'कार्ड' देतंय आणि कोण देत नाही याची अगदी तंतोतंत नोंद ठेवलेली असते. जे कार्ड देत नाहीत त्यांचे डंपर शोधून त्यांच्यावर लाखो रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येते. या 'कार्ड'मुळे शासनाचा करोडो रुपये महसूल बुडत असल्याचे दिसून येत आहे.
अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट...
ठराविकच डंपरवर कारवाई का करण्यात येते असे संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता ते काहीही बोलत नाहीत. अधिकारी याबाबत बोलण्याचे टाळतात म्हणजे पथकाच्या 'कार्ड' पद्धतीला त्यांचे अभय आहे का? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
वाहतूक पोलीसांचाही चौकानुसार दर ठरलेला...
केवळ प्रादेशिक परिवहन विभागाकडूनच बेकायदा वसुली केली जाते असे नाही तर वाहतूक पोलीसांचेही प्रत्येक चौकानुसार दर ठरलेले आहेत. त्यांच्याकडूनही दरमहा 'तंतोतंत' वसूली केली जाते अन्यथा गाडीवर कारवाई केली जाते.
"सुरेश आव्हाड आणि संतोष झगडे यांच्या पथकाने एकूण पाच वाहनावर कारवाई करून जागेवरच दंड वसूली केली आहे. एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. 'कार्ड' सारख्या प्रकाराशी सहमत नाही." संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
वाहतूक पोलीसांचाही चौकानुसार दर ठरलेला...
केवळ प्रादेशिक परिवहन विभागाकडूनच बेकायदा वसुली केली जाते असे नाही तर वाहतूक पोलीसांचेही प्रत्येक चौकानुसार दर ठरलेले आहेत. त्यांच्याकडूनही दरमहा 'तंतोतंत' वसूली केली जाते अन्यथा गाडीवर कारवाई केली जाते.
"सुरेश आव्हाड आणि संतोष झगडे यांच्या पथकाने एकूण पाच वाहनावर कारवाई करून जागेवरच दंड वसूली केली आहे. एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. 'कार्ड' सारख्या प्रकाराशी सहमत नाही."
- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.