
Bigg Boss Marathi 3: भावाची बाजू घेतल्यानं आदर्श शिंदे ट्रोल
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन चांगलाच रंगला आहे. तसेच हा कार्यक्रम वेगवगेळ्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे. या पर्वातील पहिला कॅप्टन होण्याचा मान उत्कर्ष शिंदेला मिळाला. कॅप्टन होण्यासोबतच ‘हल्लाबोल’ या टास्कचा संचालकही तो होता. दोन गटात हा टास्क खेळण्यात आला होता. संचालकानं त्याची जबाबदारी नि:पक्षपणे पार पाडावी असं अपेक्षित होतं. मात्र, त्यानं त्याच्या टीमची बाजू घेत त्यांच्या बाजूनेच निर्णय दिल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी भरणाऱ्या बिग बॉसच्या चावडीवरही महेश मांजरेकरांनी प्रेक्षकांची मतं आणि भावना स्पर्धकांपर्यंत पोहोचवत त्यांची शाळा घेतली. आता उत्कर्षचा भाऊ आदर्शने सोशल मीडियवार एक पोस्ट शेअर करत शोमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल त्याचे मत मांडले आहे.
“सुरुवातीला उत्कर्ष शिंदेचे विचार विशाल या स्पर्धकासोबत पटत नव्हते. तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टन्सीसाठी केला. पण कॅप्टन्सी टास्कमध्ये केलेल्या मदतीची परतफेड म्हणून उत्कर्षने विशालला नॉमिनेट न करता सेफ केले, हे नंतर विशालच्या लक्षात आले. पण चावडीला हा फेअर गेम दिसला नाही”, अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे. बिग बॉसची चावडीच डबल ढोलकी असल्याचं त्यानं त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नेटकऱ्यांनी आदर्शच्या या पोस्टवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे. बिग बॉसमध्ये जे झालं ते सर्वांनीच पाहिलं , भाऊ म्हणून तुम्ही त्याची बाजू घेऊ शकत नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. बिग बॉसच्या चावडीवर मांजरेकर जे म्हणाले ते प्रेक्षकांच्याही मनात होतं, असं ही अनेकांनी म्हटलं आहे.
घरात हल्लाबोल टास्कदरम्यान कॅप्टन आणि संचालक असलेल्या उत्कर्षने एकाच गटाकडून म्हणजेच स्वःताच्या गटाकडून निर्णय घेताना वारंवार दिसले. हल्लाबोल टास्कदरम्यान जय आणि गायत्री यांनी मिरचीच्या धुरीचा वापर केला होता. परंतु, दुसऱ्या गटाला मिठाचं पाणी वापरण्यासही उत्कर्षने मनाई केली होती. त्यावरून मांजरेकरांनी उत्कर्षची शाळा घेतली.