Video : गॅसदरवाढीने बिघडविले ‘किचन’चे गणित!

अक्षता पवार
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सिलिंडर कसा काटकसरीने वापरणार - कुंभार
महिनाभर सिलिंडर पुरविण्यासाठी शेगडी, इलेक्‍ट्रिक वस्तूंचा वापर करावा लागतो. एकीकडे चुली हद्दपार व्हाव्यात; म्हणून प्रयत्न होत आहेत, पण दुसरीकडे दरवाढीमुळे चुलीचा पर्याय पुन्हा सोपा वाटत आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू जपून वापरू शकतो, पण सिलिंडर कसा काटकसरीने वापरणार,’’ असा प्रश्‍न वडगाव बुद्रुक येथील छाया कुंभार या गृहिणीने विचारला. त्यांच्या परिवारात तिघे आहेत.

पुणे - कसबा पेठेतल्या नातूवाड्यातल्या पुष्पाताईचं वय ४० वर्ष. सहा जणांचं त्यांचं कुटुंब. धुणीभांडी करणाऱ्या पुष्पाताई व त्यांचे पती संजय मोडल घरात कमावते. महिन्याला त्यांचं उत्पन्न १२ हजार रुपये. त्यात औषधांपासून सगळाच खर्च. त्या कशाबशा घर चालवतायेत; अशातच सिलिंडर महागल्याचं बुधवारी त्यांच्या कानावर आलं अन् वाढलेला घरखर्च कसा भागवायचा? हे नवं ओझं घेऊन पुष्पाताई सायंकाळी ‘किचन’मध्ये गुंतल्या.

गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याने डोळ्यात पाणी आणलं, त्याच्या भाववाढीतून सावरत असताना आता गॅस सिलिंडरनेही आपला ‘भाव’ वाढून ‘किचन’चे गणित बिघडविले. फळ, पालेभाज्यांचे भाव कमी होऊ शकतात, पण सिलिंडरच्या किमती उतरत नसल्याने महागाईचे नवे संकट उभे ठाकल्याची भावना गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिला व हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुष्पा मोडल म्हणाल्या, ‘‘आमच्या परिवारात चार मुली. त्यांच्या शिक्षणामध्ये अडचण येऊ नये; म्हणून आम्ही नवरा-बायको मिळेल ते काम करतो. एकतर भाज्या महाग आणि आता गॅसच्या दरवाढीमुळे पैसे वाचवायचे कसे, हा मोठा प्रश्‍न आहे.’’

कर्वेनगरमधील घरकाम करणाऱ्या ४२ वर्षीय लता पटाईत म्हणाल्या, ‘‘सिलिंडरच महाग झाला नाही, तर रोजचे जेवण महाग झाले. छोटी-मोठी कामे करून घर सांभाळणाऱ्या आमच्यासारख्यांना इतका महाग सिलिंडर परवडणारा नाही. त्यापेक्षा घरात चूलच वापरायची का?’’ 

लता मावशींच्या घरात चारजण असून, त्या एकमेव कमावत्या आहेत. महिन्याला पाच हजार रुपये एवढे तुटपुंजे त्यांचे उत्पन्न आहे.  

‘‘हॉटेल व्यवसायामुळे दिवसाला एक गॅस सिलिंडर लागतो. जानेवारीपर्यंत हा सिलिंडर १२०० रुपयांना मिळत होता. परंतु आता तो १४६१ रुपयांना पडतो. त्यामुळे महिन्याला सुमारे साडेदहा हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.’’ असे हॉटेल व्यावसायिक हरीश शेट्टी यांनी सांगितले.

प्रत्येक महिन्याला ४ ते ५ गॅस सिलिंडर लागतात. वाढलेल्या दरामुळे आमचा नफा घटेल आणि जर यासाठी चहाच्या दरात वाढ केली, तर ग्राहकांची संख्या निम्म्याने घटण्याची शक्‍यता आहे.
- प्रेम पटेल, चहाविक्रेता, बुधवार पेठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kitchen Calculation Collapse by Gas cylinder rate increase