
Relationship : साताजन्माची गाठ किडनीदानातून विणली घट्ट
वालचंदनगर : असं म्हटले जाते की, लग्नाच्या रेशीम गाठी स्वर्गात बांधल्या जातात.... लग्नामध्ये सात फेरे घेऊन आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतले जाते. बेलवाडी (ता. इंदापूर) जवळील कुंभारवस्ती येथील प्राथमिक शिक्षिका असणाऱ्या महिलेने आयुष्यभर साथ देण्यासाठी किडनी (मूत्रपिंड) दान करून पतीला जीवनदान देऊन विवाहामध्ये घेतलेल्या वचनांची पूर्तता केल्याची घटना घडली.
इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावाजवळील कुंभारवस्ती येथे दीपक कुंभार व बकुळा कुंभार हे दांपत्य राहत असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघांच्या विवाहाला १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. दीपक कुंभार हे ग्रामसेवक आहेत. तर बकुळा कुंभार या लासुर्णे जवळील टकलेवस्ती जवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आहेत.
दीपक कुंभार यांना अचानक कोरोना काळामध्ये मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे सांगितल्यानंतर कुंभार कुटुंबाला धक्का बसला. सुरवातीच्या काळामध्ये आठवड्यातून दोन-तीन वेळा डायलिसिस करण्यात येत होते. मात्र, डायलिसिसमुळे होणारा त्रास असाह्य होत असल्याने डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचविला. मात्र मूत्रपिंड कोण देणार?
असा मोठा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पत्नी बकुळा यांनी क्षणाचा विचार न करता मूत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यारोपण करण्यासाठी कायदेशीररीत्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तमिळनाडूमधील कोइमतूर येथे नोव्हेंबर २०२२ रोजी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
सध्या कुंभार दोघांची प्रकृती ठणठणीत आहे. सध्याच्या काळामध्ये पती-पत्नीमध्ये वाद-विवादाच्या घटना घडत असून वाद-विवाद टोकाला जात आहेत. आधुनिक युगातील सुशिक्षित पिढीतील काही युवक-युवती लग्नानंतर काही दिवसामध्ये घटस्फोटापर्यंत टोकाचा निर्णय घेत असून त्यांच्यासाठी बकुळा व दीपकच्या आयुष्याच्या कहाणी निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे.
दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजल्यानंतर माझ्यासह घरातील सर्वजण चिंताग्रस्त झाले होते. मात्र पत्नीने दिलेला आधार व किडनीमुळे मला जीवनदान मिळाले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी जीवनसाथी मिळाली आहे.
- दीपक कुंभार