पुणे जिल्ह्यातील कोळेवाडी गावठाण सातबाऱ्याहून गायब; भूमाफियांचा अनधिकृतपणे ताबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolewadi Village
पुणे जिल्ह्यातील कोळेवाडी गावठाण सातबाऱ्याहून गायब; भूमाफियांचा अनधिकृतपणे ताबा

पुणे जिल्ह्यातील कोळेवाडी गावठाण सातबाऱ्याहून गायब; भूमाफियांचा अनधिकृतपणे ताबा

आंबेगाव बुद्रुक - नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या जांभूळवाडी कोळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत पैकी मौजे कोळेवाडीला अद्यापही गावठाण दर्जा दिला गेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये महसूल प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटला आहे. तर २०१० पर्यंत सातबारा वर दिसणारे गावठाण नंतर सातबाऱ्याहुन गायब झाले आहे. तर भुमाफीयांकडून गिळंकृत केलेला गावठाणाचा सातबारा पुन्हा गावठाणाला मिळेल का असाही सवाल ग्रामस्थ करत आहेत.

मौजे कोळेवाडी येथील जुना सर्व्हे नं १५२ व नवीन सर्व्हे नं १७ च्या सातबारा वर ५२ एकर २ गुंठे इतके क्षेत्र आहे. परंतु, यातील असणाऱ्या गावठाणाची नोंदचं गायब झाल्याने ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत. जुना सर्व्हे नं १५२ मधील साधारण तीन ते साडेतीन एकर जमीन ही गावातील कुळांना कसण्यासाठी देण्यात आलेली आहे.तर उर्वरित ९ एकर जमीन ही गावठाणासाठी राखून ठेवण्यात आली होती.

आंबेगाव मधून विलग होऊन जांभुळवाडी कोळेवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत २००३ साली अस्तित्वात आली. त्यानंतर, २०१० पर्यंत महसूल नोंदीवर कोळेवाडीचा देऊळ, गाव दर्शक नऊ एकराचा गावठाणाचा नकाशाही उपलब्ध होता. दरम्यान, २०१८ पर्यंत जांभुळवाडी कोळेवाडीला गावठाण दर्जा मिळावा म्हणून ग्रामपंचायती कडून जिल्हा परिषद,हवेली तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाला अर्ज करण्यात आले होते. त्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाकडून होणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. डिसेंबर २०२१ मध्ये ग्रामपंचायत पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर, जांभूळवाडीचा पाच एकर गावठाणचा सिटी सर्व्हे करण्यात आला होता. पीएमआरडीए च्या नकाशातही जांभुळवाडी गावाचे गावठाण दिसते आहे. तर कोळेवाडी त्यातूनही गायब आहे.

विहिरीतचं नाही तर पोहऱ्यात कसे येईल?

सातबाऱ्याहून गायब झालेल्या ९ एकर क्षेत्रावर काही भूमाफियांनी अनधिकृतपणे ताबा ठोकला असल्याने क्षेत्रच शिल्लक राहिलेले नाही. तर गावाकऱ्यांना धमकावून, बंदूका आणि दंडूकाचा धाक दाखवून गावठाणाची जागा गिळंकृत केल्याची तक्रारही ग्रामस्थ करत आहेत. भूमाफियाला प्रशासन तर पाठीशी घालत नाही ना असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो आहे.

प्रतिक्रिया :गावाला अद्यापही गावठाण दर्जा मिळालेला नाही. गावठाणातील जागेत असणाऱ्या मंदिरांतही ग्रामस्थांना जाता येत नाही. त्याठिकाणी अनधिकृतपणे गावठाणाच्या जागेवर ताबे टाकले आहेत. त्यामुळे गावठाणाच्या जागेत अतिक्रमणे वाढली आहेत.

- रघुनाथ चोरगे, ग्रामस्थ कोळेवाडी.

जांभुळवाडी कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाण दर्जा देण्या संबंधी अर्ज दिले होते. पण त्याची प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही.

- दिलीप शेलार, माजी सरपंच जांभुळवाडी कोळेवाडी

कोळेवाडी गावाला गावठाण दर्जा देण्यात यावा या संदर्भात हवेली तहसील कार्यालयाकडुन जिल्हाधिकाऱ्यांना २०१८ साली पत्र देण्यात आले होते. ज्यावेळी गावाला गावठाण दर्जा मिळेल त्यावेळी गावठाणाचे ९ एकर असलेले क्षेत्र गावठाणाला मिळेल.

- तृप्ती कोलते, तहसीलदार तहसील कार्यालय हवेली.

गाव महापालिकेत समाविष्ट झाले तरी गावाला गावठाण नाही. पीएमआरडीए च्या नकाशात कोळेवाडीचा उल्लेखही नाही. जिल्हाधिकारी कार्यालयालाही अर्ज केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गावठाण दर्जाचा महसूल विभागाने प्रश्न मार्गी लावावा.

- आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती.

Web Title: Kolewadi Village Disappears From Satbara Unauthorized Possession Of Land Mafia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top