

कोल्हापूर, ता. ३ ः शक्तिपाठ महामार्गावरून माजी खासदार राजू शेट्टी व शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील वादातून आज दोन्ही नेत्यांचे समर्थक समोरासमोर आले. क्षीरसागर यांच्या निषेधार्थ आंदोलन करून परत निघालेल्या शेट्टींच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या वाहनांवर क्षीरसागर समर्थकांनी लाथाबुक्क्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने येथील शिवाजी चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने अनर्थ टळला.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेट्टी यांना सरकार उलटे टांगून ठेवेल, असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी क्षीरसागर टक्केवारी घेत असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. शेट्टी यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात शेट्टी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडो मारो आंदोलन केले.
याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवाजी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. आंदोलनानंतर कार्यकर्ते परतत असतानाच शिवसेनेचे समर्थक मोठ्या संख्येने आले. त्यांनी माळकर तिकटीजवळ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर अर्वाच्च शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. काही कार्यकर्त्यांनी या वाहनांचा पाठलागही केला. त्यानंतर पोलिस व क्षीरसागर समर्थकांत जोरदार झटापट झाली.
त्यानंतर शेट्टींच्या विरोधात घोषणाबाजी करत क्षीरसागर समर्थकांनी आंदोलनस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला. जमावाला रोखत पोलिसांनी जवळपास पंधरा ते वीस जणांना ताब्यात घेतले. आंदोलनस्थळी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.