अरुंद रस्ता, वाहतूक कोंडी अन् खड्डे, कोल्हेवाडी-शिवनगरमधील रहिवासी झाले हैराण

निलेश बोरुडे
Monday, 11 January 2021

केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र, राष्ट्रीय जल अकादमी, एनडीए,डीआयएटी अशा मोठ्या शासकीय संस्था परिसरात असल्याने खुप वर्षांपासूनच कोल्हेवाडी आणि शिवनगर या भागात घरांची मागणी वाढत गेली व परिणामी गुंठेवारीतील घरे, इमारती तसेच मोठमोठे गृहप्रकल्प या भागात उभे राहिले. सध्याही अनेक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत.

किरकटवाडी(पुणे) : खडकवासला गावच्या कोल्हेवाडी आणि किरकटवाडी गावच्या शिवनगर या भागातील सुमारे दहा हजार च्या आसपास असलेल्या लोकवस्तीतील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून दररोज सकाळ-संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी, अरुंद रस्ता आणि खड्ड्यांमुळे हैराण झाले आहेत. जिल्हा परिषद, पीएमआरडीए आणि महसूल विभागातील समन्वयाचा अभाव आणि प्रशासकीय अनास्थेचा फटका येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र, राष्ट्रीय जल अकादमी, एनडीए,डीआयएटी अशा मोठ्या शासकीय संस्था परिसरात असल्याने खुप वर्षांपासूनच कोल्हेवाडी आणि शिवनगर या भागात घरांची मागणी वाढत गेली व परिणामी गुंठेवारीतील घरे, इमारती तसेच मोठमोठे गृहप्रकल्प या भागात उभे राहिले. सध्याही अनेक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. कोल्हेवाडी आणि शिवनगर या भागांना सिंहगड रस्त्यापासून आत ये-जा करण्यासाठी एकमेव शिवरस्ता आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे हा शिवरस्ता कमी पडू लागला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक कोंडी होते. त्यातच अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाजी विक्रेते बसलेले असल्याने त्यांचाही वाहतुकीस अडथळा होतो. तसेच जागोजागी या रस्त्यावर खड्डे पडलेले असल्याने अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

परिसरातील शेकडो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन पीएमआरडीए आयुक्तांकडे देण्यात आलेले आहे. खासदार सुप्रिया सुळे,आमदार भिमराव तापकीर व खडकवासला गावचे माजी सरपंच विजय कोल्हे हे या रस्त्याच्या कामासाठी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. 2013 साली जिल्हाधिकाऱ्यांनी पीएमआरडीए आयुक्तांना या रस्त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते मात्र आजपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. किरकटवाडी, खडकवासला ही गावे महापालिकेत समाविष्ट होत असल्याने आता तरी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल या आशेवर या भागातील नागरिक आहेत.

याबाबत पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असता,"या रस्त्याबाबत सर्व्हे करून प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता परंतु  कोव्हिड आपत्कालीन परिस्थितीत कामाला निधी उपलब्ध होऊ शकत नाही," असे उत्तर मिळाल्याचे संबंधित अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

"व्यावसायिक, बिल्डर यांच्या बांधकामांमुळे रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता होण्यासाठी जेथे स्थानिकांचा विरोध होत आहे त्यांच्याशी सरकारी मोबदल्याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे.रस्ता पीएमआरडीएने करावा,जिल्हा परिषदेने करावा किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा याबाबत सरकारी अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम दिसून येत आहे."
- शैलेश मते, रहिवासी, शिवनगर, किरकटवाडी.

" मागील पंधरा ते वीस वर्षांपासून या रस्त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे.दोन वेळा आंदोलन केले.लोकप्रतिनीधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रानंतर 2013 साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पीएमआरडीए आयुक्तांना कार्यवाही करण्याबाबत सुचित केले होते परंतु अद्यापही काहीच झाले नाही.आता महानगर पालिकेच्या माध्यमातून या रस्त्याचा विषय मार्गी लागेल ही एकच आशा शिल्लक आहे."
- विजय कोल्हे, माजी सरपंच, खडकवासला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhewadi Shivnagar resident facing Narrow roads traffic jams and potholes issue