पुणे : कोथरूड महोत्सव शनिवारपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

 ‘संस्कृती प्रतिष्ठान’तर्फे येत्या १ ते ४ फेब्रुवारीदरम्यान कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचा दशकपूर्ती सोहळा रंगणार आहे. संगीतमार्तंड पंडित जसराज यांना हा सोहळा समर्पित असून, त्यांच्या सांगीतिक योगदानाचे विविध पैलू यात उलगडले जातील. 

पुणे - ‘संस्कृती प्रतिष्ठान’तर्फे येत्या १ ते ४ फेब्रुवारीदरम्यान कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचा दशकपूर्ती सोहळा रंगणार आहे. संगीतमार्तंड पंडित जसराज यांना हा सोहळा समर्पित असून, त्यांच्या सांगीतिक योगदानाचे विविध पैलू यात उलगडले जातील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी योगेश देशपांडे व विनोद सातव उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, ‘‘कोथरूडमधील आयडियल मैदानावर दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हा महोत्सव होईल. सुरवातीचे दोन दिवस योगेश देशपांडे यांच्या संकल्पनेतून रसराज सन्मान सोहळा साकारण्यात येईल.’’ 

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, दिग्दर्शक जब्बार पटेल व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पं. जसराज यांचा गौरव करण्यात येईल. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुहास व्यास यांना संस्कृती कला जीवनगौरव पुरस्कार व तबलावादक पं. विजय घाटे यांना संस्कृती कला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 

मोहोळ म्हणाले की, एका ग्रहाला ‘नासा’बरोबरच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र विभागातर्फे पंडित जसराज यांचे नाव देण्यात आले आहे. हा महोत्सव त्यांना समर्पित करण्यात येणार आहे.

१ फेब्रुवारी -  पं. जसराज स्कूल ऑफ म्युझिक फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे गायन  जसराज यांचे नातू स्वर शर्मा यांचे गायन  सरोदवादक अमजदअली खाँ यांची प्रस्तुती  उस्ताद तौफिक कुरेशी आणि त्यांचे पुत्र शिखर यांचे जेंबेवादन  ख्यातनाम गायक हरिहरन यांचे गझलगायन 

२ फेब्रुवारी -  राकेश चौरसिया यांचे बासरीवादन  पं. संजीव अभ्यंकर व विदुषी अश्‍विनी भिडे-देशपांडे यांची जसरंगी जुगलबंदी  पं.जसराज, पं. हरिप्रसाद चौरसिया, डॉ. प्रभा अत्रे व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी गप्पा   

३ फेब्रुवारी -  रामकृष्ण मठ निर्मित ‘युगनायक विवेकानंद’ हे महानाट्य 

४ फेब्रुवारी -  ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा लाइव्ह एपिसोड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kothrud Festival from Saturday