esakal | राज्यात सरकारचं हम करेसो कायदा; चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil pune

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार राज्यात हम करे सो कायदा असं वागत असल्याचं म्हटलं आहे. राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारने हे क्षुद्रपणाचे लक्षण असल्याची टीका त्यांनी केली.

राज्यात सरकारचं हम करेसो कायदा; चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीवर टीका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार राज्यात हम करे सो कायदा असं वागत असल्याचं म्हटलं आहे. राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारने हे क्षुद्रपणाचे लक्षण असल्याची टीका त्यांनी केली. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देहराडूनला खासगी विमानाने जाण्यासाठी परवानगी नाकारली गेली. यावरून बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, साधारणपणे राज्यपालांना जेव्हा प्रवासाला जाणार असतात तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे फाईल पाठवली जाते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला लगेच मंजुरी द्यायची असते. मात्र यावेळी असं झालं नाही आणि राज्यपालांना खासगी विमानाने जावं लागलं. सरकारने द्वेषाचं, सुडाचं टोक गाठलं आहे.

भारतरत्नांच्या ट्विटची चौकशी कशासाठी?
देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून सोशल मीडियावर सध्या दोन गट पडले आहेत. याच दरम्यान काही परदेशी सेलिब्रिटींनी ट्विट केल्यानंतर देशातील दिग्गजांनी त्याविरोधात ट्विट केली. या ट्विटची चौकशी राज्य सरकार करणार आहे. यावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी देशहिताचे ट्वीट केले आहे. त्याची तुम्ही चौकशी कशी करता? त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही आहे की नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला.

हे वाचा  - पुणेकर गारठले! पाच दिवसांपासून वाढतोय थंडीचा कडाका,

तरुणी आत्महत्या प्रकरणी अद्याप कारवाई नाही
पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, घटनेला 48 तास झाल्यानंतरही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. पोलिस सांगतायत की तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी. पण यामध्ये सुमोटो दाखल करुन घेता येत नाही का? कायदा विषय संपला का? की तुम करे सो कायदा आहे असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

सरकारचा हम करे सो कायदा
महाविकास आघाडीच्या कामावरही त्यांनी टीका केली. लोकांनी हे सरकार निवडून दिलेलं नाही. गिमिक करून त्यांनी सत्ता स्थापन केलीय. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास ते बांधील नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचे सरकार हम करे सो कायदा असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मनसेत अमराठींचा प्रवेश चांगली गोष्ट
मनसेमध्ये अमराठी लोकांच्या प्रवेशावर चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा याचं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसे सोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल तर मनसेसोबत युती होऊ शकते पण त्यांनी अन्य प्रांतीयांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे.